दमदार सातत्यासह खेळ करत आरसीबीने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचं जेतेपद पटकावलं. शांत संयमी पद्धतीने नेतृत्व हाताळणारा रजत पाटीदार, चाळिशीच्या उंबरठ्यावरही खोऱ्याने धावा करणारा विराट कोहली आणि चौकार-षटकारांची लयलूट होत असतानाही शिस्तबद्ध गोलंदाजी करणारे गोलंदाज हे आरसीबीच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आरसीबीच्या यशात खेळाडूंच्या बरोबरीने सपोर्ट स्टाफचा मोलाचा वाटा आहे. कोण आहेत ही मंडळी आणि त्यांनी कशा पद्धतीने आरसीबी संघाचे डावपेच ठरवले हे जाणून घेऊया.

मो बोबट

गेल्या वर्षी आरसीबीने जेतेपद पटकावलं तेव्हा मो बोबट यांचे उद्गार होते- हे जेतेपद आरसीबीसाठी खास आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणणारं जेतेपद आहे. चाहत्यांचं प्रेम, खेळाडूंची अथक मेहनत याचं हे फळ आहे. पण हा शेवट नव्हे. ही सुरुवात आहे. अशी अनेक जेतेपदं आपल्याला पटकवायची आहेत. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मो बोबट यांचे शब्द होते- आपण जेतेपद राखण्यासाठी आलेलो नाही. नव्याने जेतेपद जिंकण्यासाठी आलो आहोत. आरसीबीच्या खेळातून मो बोबट यांचं म्हणणं किती खरं आहे याचा प्रत्यय आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाबरोबर अनेक वर्ष काम केल्यानंतर मो यांनी आरसीबीच्या टीम डिरेक्टर पदाचा कार्यभार स्वीकारला. स्पोर्ट्स सायन्स अँड मॅनेजमेंट मधून डिग्री आणि कोचिंगचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मो यांनी इंग्लंडच्या युवा संघांबरोबर काम केलं. नव्या प्रतिभावान खेळाडूंचा शोध, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तयार करणं हेच मो यांचं काम होतं. आरसीबीच्या संघाकडे चाहत्यांचं मोठं पाठबळ आहे पण दडपणाच्या क्षणी संघ कच खातो हे मो यांच्या लक्षात आलं. त्यासाठी संघाबरोबर अनेक सेशन्स घेतले. विराट कोहली नेतृत्वाच्या ओझ्याने दडपून जातो हे समजताच रजत पाटीदारकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. विराट कोहली आणि आरसीबी समानार्थी शब्द वाटावेत इतका हा ऋणानुबंध घट्ट आहे. परंतु आरसीबीचा संघ प्रामुख्याने विराटवरच अवलंबून राहतो हे लक्षात आल्यावर मो यांनी सर्वसमावेशक संघ निवडण्यावर भर दिला. फिल सॉल्ट, रजत पाटीदार, वेंकटेश अय्यर, टीम डेव्हिड अशी एक भक्कम फळी तयार केली. यांनी विराटवरचा भार हलका केला.जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, रसिख सलाम हे त्रिकुट विकसित केलं. रिंकू सिंगने ५ षटकार मारल्यानंतरही आरसीबीने यश दयाळला ताफ्यात घेतलं. त्याने संघाचा विश्वास सार्थ ठरवला. अष्टपैलू कृणाल पंड्या संघाला संतुलन मिळवून देऊ शकतो हे जाणून लिलावात त्याला संघात समाविष्ट केलं.

अँडी फ्लॉवर

झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि मुख्य फलंदाज-यष्टीरक्षक म्हणून दमदार कारकीर्द असलेल्या अँडी फ्लॉवर यांनी निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. अँडी फ्लॉवर यांनी प्रशिक्षकपद स्वीकारलं की संघांची कामगिरी सुधारते असं आकडेवारी सांगते. म्हणूनच जगभरातील संघमालक अँडी फ्लॉवर यांच्या मिडास टचसाठी उत्सुक असतात. २०१० मध्ये फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक असताना इंग्लंडने टी२० वर्ल्डकप जिंकला. फ्लॉवर प्रशिक्षकपदी असताना इंग्लंडने तीन वेळा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला हरवत अॅशेसवर कब्जा केला. त्यांच्या कार्यकाळातच इंग्लंडने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत गदा पटकावली. आयपीएल स्पर्धेत फ्लॉवर लखनौ सुपरजायंट्सचे प्रशिक्षक होते. त्यावेळी लखनौ संघाने २०२२ आणि २०२३ हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. २०२४ मध्ये त्यांनी आरसीबीच्या प्रशिक्षकपदाची धुरा हातात घेतली. इतकी वर्ष खेळूनही आरसीबीला जेतेपदाने दूर ठेवलं होतं. २०२४ मध्ये आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षी त्यांनी जेतेपदाचा दुष्काळ संपवत पहिल्यांदा जेतेपदाची कमाई केली. कामगिरीत सातत्य राखत आरसीबीने पुन्हा एकदा जेतेपदावर कब्जा केला. फ्लॉवर कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधून त्यांची संघातली नेमकी भूमिका काय हे फ्लॉवर स्पष्ट करतात. प्रत्येक सामन्यासाठी प्रतिस्पर्ध्यांचा सखोल अभ्यास करून डावपेच आखण्यात फ्लॉवर माहीर आहेत. इंग्लंडसारख्या आंतरराष्ट्रीय संघाचं तसंच जगभरात सुरू असलेल्या टी२० संघांचं प्रशिक्षकपद भूषवत असल्याने या फॉरमॅटचा चोख अभ्यास आहे. दडपणाच्या क्षणी खेळ कसा उंचवावा यासंदर्भात ते मार्गदर्शन करतात. फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीतही फ्लॉवर घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन होते आणि नोट्स काढत होते. जेतेपदावर नाव कोरल्यानंतर खेळाडूंनी बर्फाचा एक क्रेट त्यांच्या डोक्यावर रिकामा करत आनंद साजरा केला.

दिनेश कार्तिक

भारताच्या पहिल्यावहिल्या टी२० सामन्यात सामनावीर ठरलेला डीके अर्थात दिनेश कार्तिक हा सळसळत्या ऊर्जेचा स्रोत आहे. एक तपाहून अधिक काळ भारतीय संघाकडून तसंच आयपीएल स्पर्धेत सहा विविध संघांकडून खेळण्याचा अनुभव दिनेशकडे आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षक, मधल्या फळीतील फलंदाज आणि फिनिशर आणि खेळाचा बारकाईने अभ्यास ही दिनेशची ओळख आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर समालोचनादरम्यान दिनेशचा अभ्यास वारंवार दिसतो. खेळाडू म्हणून आरसीबी संघाचा भाग राहिलेल्या दिनेशकडून खेळाडूंना खूप शिकायला मिळतं. यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने दिनेशच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात तसंच अनुभवी खेळाडूंना त्यांचा खेळ बिनचूक करण्यात दिनेश नेहमीच मदत करतो. भारतीय युवा खेळाडू आणि अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू यांची मोट दिनेश सहजपणे बांधतो. कर्णधार, यष्टीरक्षक, फिनिशर अशा विविध भूमिका निभावल्यामुळे दडपणाच्या क्षणी दिनेशचा अनुभव कामी येतो.

ओंकार साळवी

मुंबई क्रिकेट वर्तुळात हे नाव ओळखीचं आहे. मुंबई संघाच्या वाटचालीत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ओंकार यांचं योगदान मोलाचं राहिलं आहे. आरसीबीशी करारबद्ध होण्यापूर्वी ओंकार कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबर काम करत होते. यंदाच्या हंगामात अडीचशे धावाही कमी पडत असताना आणि वारंवार षटकारांची लयलूट होत असताना गोलंदाजांना प्रोत्साहित करणं हे अवघड काम ओंकार यांनी साधलं आहे. मोठ्या आकाराच्या बॅट घेऊन खेळणारे फलंदाज, छोटी मैदानं, फलंदाजधार्जिणे नियम अशा विपरीत परिस्थितीतही प्रतिस्पर्धी फलंदाजांना जाळ्यात अडकवण्यासाठी योजना आखणे, गोलंदाजांनी कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी या सगळ्याची आखणी ओंकार यांनी केली. पडद्यामागे राहून काम करण्यावर ओंकार यांचा भर असतो.

मलोलन रंगराजन

आरसीबीच्या टॅलेंट स्काऊट विभागाची धुरा सांभाळणारे मलोलन रंगराजन आता सहाय्यक प्रशिक्षक आहेत. तामिळनाडूसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या मलोलन यांची पारखी नजर आरबीसीसाठी उपयुक्त ठरली आहे. खेळाडूंशी मनमोकळा संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यात मलोलन यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते आरसीबीच्या महिला संघाचं प्रशिक्षकपदही भूषवतात. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्येही प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

या मंडळीच्या बरोबरीने एक मोठ्ठा चमू कार्यरत असतो. संघाला फिट ठेवण्यात शंकर बसू, हेड फिजिओ जेम्स पाईप, फिजिओथेरपिस्ट तामरा झ्वेक, थेरपिस्ट नवनिता गौतम, मसाजर मानेकाका अर्थात रमेश माने, मसाज थेरपिस्ट रोहित सिंग यांचा सिंहाचा वाटा आहे. दोन महिने प्रचंड उकाडा आणि आर्द्रतेत खेळणं सोपं नाही. प्रवास, दुखापती, रिहॅब-रिकव्हरी या सगळ्या गोष्टी ही मंडळी सांभाळतात.

टीम अॅनालिस्ट म्हणून फ्रेडी विइल्ड काम पाहतात. विमानतळ-स्टेडियम-हॉटेल या लॉजिस्टिक्सची जबाबदारी शमिंदर सिंग सिधू यांच्याकडे असते. अरिहंत जैन असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहतात. मार्केटिंग आणि रेव्हेन्यूचं काम निखील सोसले पाहतात. सोशल मीडिया हँडल्सचं काम अजित राममूर्ती करतात. हा सगळा डोलारा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मेनन यांच्या नेतृत्वात चालतो.