Why RCB Wearing Black Armbands in RCB vs SRH IPL 2026 Match: आयपीएल २०२६ ला अखेरीस सुरूवात झाली आहे. १९व्या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये होत आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्याची नाणेफेक घरच्या संघाने म्हणजेच आरसीबीने जिंकली आहे, यासह संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. याशिवाय दोन खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. पण यादरम्यान आरसीबीचा संपूर्ण संघ हातावर काळी पट्टी बांधून सामना खेळण्यासाठी उतरला आहे. यामागचं कारण जाणून घेऊया.

आरसीबीच्या संघामधून दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये आरसीबीकडून पहिला सामना खेळत आहेत. जेकब डफी आणि अभिनंदन सिंग यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना होत असला तरी वातावरण मात्र शांत आहे. कारण आयपीएलची ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली आहे. आरसीबीच्या विजय रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता, त्यांना श्रद्धांजली म्हणून ओपनिंग सेरेमनी रद्द केली गेली.

याशिवाय रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पहिल्याच सामन्यात हातावर काळी पट्टी बांधून उतरला आहे. आरसीबीच्या विजय रॅलीमध्ये चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या ११ जणांना संघाकडून श्रध्दांजली देण्यासाठी संघाने हातावर काळी पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाचे सीईओ राजेश मेनन यांनी पूर्वीच जाहीर केला होता. याशिवाय चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ सीट्स या कायमस्वरूपी रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. तर संघाच्या सराव जर्सी नंबर देखील ११ ठेवण्यात आला आहे. याशिवाय सामना होण्यापूर्वी संपूर्ण स्टेडियमने दोन मिनिटं शांत उभं राहून मृत्यू झालेल्या ११ जणांना श्रध्दांजली अर्पण केली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन:

विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक/कर्णधार), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा