Chennai Super Kings Record: बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. आधी गोलंदाजांनी गोलंदाजी करताना २५० धावा खर्च केल्या. तर धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव २०७ धावांवर आटोपला. चेन्नईने हा सामना ४३ धावांनी गमावला, पण सामना गमावल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
या सामन्यात २५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला चौकार षटकारांची गरज होती. चेन्नईच्या फलंदाजांनी एकूण ११ षटकार खेचले. ज्यात आयुष म्हात्रे आणि मॅट हेनरीला वगळता इतर ९ फलंदाजांनी कमीत कमी एक तरी षटकार मारला. हा टी – २० क्रिकेटमधील अतिशय दुर्मिळ रेकॉर्ड आहे. टी -२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. याआधी कुठल्याही संघातील ९ फलंदाजांनी षटकार खेचले नव्हते.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या संघातील फलंदाजांनी एकाच डावात एकूण १९ षटकार खेचले. टी -२० क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा रेकॉर्ड प्रस्थापित केला गेला आहे. टी -२० क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात १४ फलंदाजांनी षटकार मारण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी २०२०-२१ बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण १४ फलंदाजांनी षटकार खेचले होते.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिल सॉल्टने ४६ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने २८ धावा केल्या, देवदत्त पडिक्कलने ५० धावा केल्या. तर शेवटी रजत पाटीदारने नाबाद ४८ आणि टीम डेव्हिडने नाबाद ७० धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २५० पर्यंत पोहोचवली.
या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन ९, ऋतुराज गायकवाड ७ आणि आयुष म्हात्रे १ धाव करून माघारी परतला. तर सर्फराज खानने ५०, कार्तिक शर्माने ६ धावा केल्या. शेवटी प्रशांत वीरने ४३ आणि जेमी ओव्हरटनने ३७ धावांचे योगदान दिले. पण चेन्नईचा डाव २०७ धावांवर आटोपला.
