Royal Challengers Bengaluru vs UP Warriorz: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील पाचवा सामना यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून यूपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सला ५ गडी बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ गडी राखून आपल्या नावावर केला आहे.

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या यूपी वॉरियर्सचा धावांचा गाडा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी अवघ्या १४३ धावांवर थांबवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची मजबूत बॅटिंग लाईनअप पाहता हे आव्हान फार मोठं नव्हतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीला आलेल्या ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधनाने यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

डिएंड्रा डॉटीनच्या एकाच षटकात वसूल केल्या ३२ धावा

या डावातील ६ वे षटक या सामन्यातील सर्वात महागडे षटक ठरले. स्मृती मानधना आणि ग्रेस हॅरिसची जोडी धावांचा पाऊस पाडत असताना, डिएंड्रा डॉटीन गोलंदाजीला आली. या षटकातील पहिलाच चेंडू तिने नो चेंडू टाकला. या चेंडूवर ग्रेस हॅरिसने चौकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर तिने चौकार मारला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर तिने चौकार, तिसऱ्या चेंडूवर तिने षटकार मारला. चौथा चेंडूदेखील तिने सीमापार पोहोचवला. पाचव्या चेंडूवर तिने चौकार मारला. यासह तिने एकाच षटकात ३२ धावा वसूल केल्या.

यूपी वॉरियर्सने केल्या १४३ धावा

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या यूपी वॉरियर्सला सुरूवातीला मोठे धक्के बसले. संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मेग लेनिंग १४, हरलिन देओल ११, फिबी लिचफिल्ड २० धावा करत माघारी परतली. तर किरण नवगिरेला अवघ्या ५ धावा करता आल्या. शेवटी फलंदाजी करताना दीप्ती शर्माने नाबाद ४५ धावा केल्या. तर डिएंड्रा डॉटीनने नाबाद ४० धावा केल्या. या खेळीच्या बळावर यूपी वॉरियर्सने ५ गडी बाद १४३ धावा केल्या.