SmritiMandhana on Goa Trip Before WPL Final: आधी IPL आणि नंतर WPL मध्येदेखी RCB साठी काहीही मनासारखं होत नसल्याचंच चित्र दोन वर्षांपूर्वीपर्यंत पाहायला मिळत होतं. पण आरसीबी अर्थात रॉयल चॅलँजर्स बंगळुरूनं या दोन वर्षांत आयपीएल आणि डब्ल्यूपीएल या दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पुरुष संघानं आयपीएल जिंकली, तर स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील महिला संघानं डब्ल्यूपीएल जिंकली. एकदा नव्हे, दोनदा. गुरुवारी रात्री झालेल्या डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तब्बल २०४ धावांचं अशक्यप्राय आव्हान स्मृती मानधनाच्या टीमनं सहज वाटावं अशा पद्धतीने साध्य केलं आणि आयपीएलमध्ये इतिहास घडवला. पण अंतिम सामन्यातील या बलाढ्य विजयामागे आरसीबीची गोवा ट्रिपदेखील कारणीभूत ठरली का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

WPL च्या अंतिम सामन्यात काय होतं चित्र?

दिल्ली कॅपिटल्सनं अंतिम सामन्यात पहिली फलंदाजी करत तब्बल २०३ धावा फटकावल्या. यात शफाली वर्माच्या २० चेंडूंतील तडाखेबाज ४४ धावांप्रमाणेच कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जची ५७ धावांची जबाबदार खेळीदेखील समाविष्ट होती. २० षटकांत दिल्लीनं २०३ धावांपर्यंत मजल मारली. डब्ल्यूपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यात इतकं मोठं आव्हान कधीही पूर्ण होऊ शकलेलं नव्हतं. त्यामुळे पहिल्या इनिंगनंतरच स्मृती मानधना व आरसीबीच्या इतर खेळाडूंना ट्रोलिंग सुरू झालं होतं. सोशल मीडियावर आरसीबीच्या गोवा ट्रिपवर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली होती. आरसीबीचा पराभव झाला तर तो गोवा ट्रिपमुळेच असेल, असंही नेटिझन्स व खुद्द आरसीबीचे चाहतेही म्हणू लागले होते.

गोवा ट्रिपचं काय आहे कनेक्शन?

सेमीफायनलच्या सामन्यानंतर आरसीबीसाठी अंतिम सामन्यापर्यंत जवळपास एक आठवडा होता. या काळात अंतिम सामन्याची तयारी करण्याऐवजी आरसीबीच्या संघानं पहिले तीन दिवस गोव्यात वेळ घालवला. कर्णधार स्मृती मानधनासह इतर अनेक खेळाडू गोव्यातील बीचवर पार्टी करताना, नाचताना आणि एकमेकांसोबत एंजॉय करताना दिसले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच आरसीबीवर टीका होऊ लागली. अंतिम सामन्याची तयारी करणं सोडून आरसीबीचा संघ गोव्यात मजा करत असल्याचंही बोललं गेलं. पण ही गोवा ट्रिप संघासाठी का महत्त्वाची होती? याबद्दल स्मृती मानधनानं अंतिम सामन्यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली.

rcb
RCB नं WPL च्या अंतिम सामन्यात DC वर मोठा विजय मिळवून दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं ( फोटो- एक्स)

“गोवा ट्रिप आमच्यासाठी फार महत्त्वाची होती. अंतिम सामन्याआधी आम्हाला सहा दिवस मिळणार होते. या दिवसांमध्ये पूर्णवेळ क्रिकेटबाबत विचार करणं, प्रतिस्पर्धी संघासाठी धोरण ठरवणं, काय घडेल यासाठीचं नियोजन करणं असं सगळं होतं. पण त्याआधी संघातल्या सर्व खेळाडूंना आराम मिळणं आवश्यक होतं. किमान पहिले दोन-तीन दिवस तरी. आमच्यासाठी हा एक खूप फायदेशीर ब्रेक ठरला. कारण स्पर्धेच्या सुरुवातीला एकापाठोपाठ खूप सारे सामने झाले होते”, असं स्मृती मानधना म्हणाली.

गोवा ट्रिच्या ब्रेकनंतर परतल्यावर आरसीबीच्या संघानं अंतिम सामन्यासाठी कसून सराव केल्याचंही स्मृतीनं सांगितलं. या काळात फक्त हॉटेलच्या खोल्यांमध्ये बसून काहीही न करणं संघाला उपयोगी ठरलं नसतं, असंही ती म्हणाली.

अंतिम सामन्यात स्मृतीची दमदार कामगिरी!

डब्ल्यूपीएलचं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी आरसीबीच्या संघाला २०४ धावांचं भलंमोठं आव्हान पार करायचं होतं. आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. भरंवश्याची ग्रेस हॅरीस अवघ्या ९ धावांवर बाद झाली आणि गोवा ट्रिपवरून सुरू असलेलं सोशल मीडियावरचं ट्रोलिंग आणखीनच वाढलं. यानंतर मात्र स्मृती मानधना व जॉर्जिया वोलनं सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली. या दोघींनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचा यशस्वीपणे सामना तर केलाच, पण त्याचवेळी जिथे संधी मिळेल तिथे यथेच्छ हल्लाही चढवला. स्मृतीच्या ८७ धावा तर जॉर्जियाच्या ७९ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्लीचं आव्हान पार करच विजेतेपदावर दुसऱ्यांदा आरसीबीचं नाव कोरलं!