आरसीबीने सातत्यपूर्ण खेळ करत सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं. याआधी मुंबई आणि चेन्नई या संघांनी सलग जेतेपदं पटकावली आहेत. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने सर्वसमावेशक खेळ करत बाजी मारली. आरसीबीने यंदा संघात कमीत कमी बदल केले. याचं कारण ज्यांना संधी मिळाली त्यांनी चांगली कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर आरसीबीच्या खेळात व्यावसायिकता होती. जेतेपद पटकावल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी बोलताना मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी संधी न मिळालेल्या खेळाडूंचं कौतुक केलं. ज्यांना अंतिम अकरात संधी मिळाली त्यांनी सातत्याने चांगलं खेळून जिंकून दिलं. मात्र ज्यांना संधी मिळाली नाही त्या मंडळींनी सरावात शंभर टक्के योगदान दिलं. सामन्यादरम्यान निरोप पोहोचवणे, प्रचंड उकाड्यात खेळणाऱ्या खेळाडूंना पाणी, एनर्जी ड्रिंक, फळं नेऊन देणे ही कामं तत्परतेने केली. यासाठी फ्लॉवर यांनी राखीव खेळाडूंचं मनापासून कौतुक केलं. यानिमित्ताने आरसीबीच्या ताफ्यात असलेल्या मात्र खेळायची संधी न मिळालेल्या शिलेदारांविषयी जाणून घेऊया.
जॉर्डन कॉक्स
इंग्लंडसाठी ३ वनडे आणि ६ टी२० खेळलेला विकेटकीपर बॅट्समन जॉर्डन कॉक्सला अख्खा हंगाम राखीव खेळाडूतच बसावं लागलं. अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकत असल्याने आणि विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा चांगली कामगिरी करत असल्याने जॉर्डनला एकदाही संधी मिळाली नाही. इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत त्याचं नाव असायचं पण आरसीबीसाठी पदार्पण होऊ शकलं नाही. फायनलच्या मुकाबल्यात बदली फिल्डर म्हणून आलेल्या जॉर्डनने वॉशिंग्टन सुंदरचा कॅच टिपला. मात्र कॅच पकडताना बॉलचा काही भाग जमिनीला टेकला असल्याचं रिप्लेत स्पष्ट झालं. जेकब डफीच्या बॉलिंगवर वॉशिंग्टन सुंदरने पूल केला. जॉर्डनने पुढे येऊन चांगला कॅच टिपला. थर्ड अंपायर मदनगोपाळ यांनी कॅच नाकारला. यावरून आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि मैदानावरील अंपायर्स यांच्यात वादही झाला. मात्र थर्ड अंपायरचा निर्णय अंतिम असल्यामुळे खेळ पुन्हा सुरू झाला. वॉशिंग्टनने या जीवदानाचा फायदा उठत अर्धशतकी खेळी साकारली.
कनिष्क चौहान
भारताच्या U19 संघातील अष्टपैलू शिलेदार. कनिष्कसाठी दोन महिने मोठ्या खेळाडूंबरोबर सराव करता येणं, त्यांच्याकडून शिकता येणं, बोलता येणं हा अनुभव मोलाचा होता. आयपीएल विजेत्या संघाचा भाग होण्याची संधी त्याला मिळाली. वय जमेची बाजू असल्यामुळे कनिष्कला भविष्यात संधी मिळू शकते.
विहान मल्होत्रा
भारताच्या U19 संघातील आणखी एक उमदा खेळाडू. कनिष्कप्रमाणेच विहानला अंतिम अकरात संधी मिळण्याची शक्यता नव्हतीच पण विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूकडून शिकण्याची संधी त्याला मिळाली. संपूर्ण हंगामात खेळाडूंना पाणी, एनर्जी ड्रिंक, फळं, टॉवेल पुरवण्याचं काम या मंडळींनी निगुतीने केलं.
मंगेश यादव
लिलावात आरसीबीने तब्बल ५.२ कोटी रुपये खर्चून मध्य प्रदेशच्या २३वर्षीय मंगेशला ताफ्यात दाखल केलं. १४०पेक्षा जास्त वेगाने आणि अचूकतेने गोलंदाजी करणारा गोलंदाज अशी त्याची ओळख होती. चार संघ त्याला संघात घेण्यासाठी आतूर होते मात्र आरसीबीने बाजी मारली. अगदी आतापर्यंत मंगेश उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधल्या टेनिस बॉल स्पर्धांमध्ये खेळत असे. त्याचा खेळ पाहून वडिलांच्या मित्राने त्याला दिल्लीत येण्यास सांगितलं. तिथून त्याच्या करिअरने योग्य वळण घेतलं. चांगले प्रशिक्षक, वरिष्ठ खेळाडू भेटत गेल्यामुळे मंगेशला नवनवीन गोष्टी शिकता आल्या. कायदेशीर लढाईत अडकल्यामुळे डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाळ यंदा खेळू शकणार नव्हता. त्यामुळे आरसीबीने लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून मंगेशची निवड केली. मात्र यशच्या जागी संधी मिळालेल्या रसिख सलामने सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे मंगेशचं पदार्पण लांबणीवर गेलं. जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यासारख्या अनुभवी खेळाडूंकडून शिकण्याची मोठी संधी मंगेशला मिळाली.
सात्विक देसवल
१९वर्षीय सात्विकसाठी अंतिम अकरात संधी मिळणं कठीणच होतं पण विजेता संघ कशी तयारी करतो, डावपेच कसे आखले जातात, मोठे खेळाडू दडपणाचा सामना कसा करतात हे सगळं सात्विकला शिकता आलं.
रिचर्ड ग्लीसन
श्रीलंकेचा डावखुरा वेगवान बॉलर न्यूवान तुषाराला श्रीलंका क्रिकेट बोर्डाला एनओसी नाकारल्याने तो भारतात येऊच शकला नाही. यामुळे हंगामाच्या उत्तरार्धात आरसीबीने इंग्लंडच्या ३८वर्षीय रिचर्ड ग्लीसनला ताफ्यात घेतलं. जगभरात टी२० क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव ग्लीसनकडे आहे. याआधी तो मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडे होता. हेझलवूड, डफी फॉर्मात असल्यामुळे ग्लीसनला संधी मिळू शकली नाही.
विकी ओत्सवाल
लोणावळ्याचा आणि महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या विकीला अंतिम अकरात संधी मिळणं कठीण होतं. भारताच्या U19 संघाकडून खेळताना विकीने चांगली कामगिरी केली होती. विकी याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता मात्र तिथेही त्याचं आयपीएल पदार्पण झालं नाही.
स्वप्नील सिंग
३५वर्षीय स्वप्नीलसाठी एकही सामन्यात संधी न मिळणं निराशाजनक होतं. स्वप्नील याआधी आरसीबीसाठी खेळला आहे. पंजाब किंग्ज, लखनौ सुपरजायंट्स असा प्रवास करत स्वप्नील आरसीबीत स्थिरावला आहे. २०२४ हंगामात त्याने ६ विकेट्स घेतल्या होत्या. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बडोदा आणि उत्तराखंडकडून खेळणाऱ्या स्वप्नीलकडे टी२० क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. पण यंदा अंतिम अकरातल्या जागेने त्याला हुलकावणी दिली.
