scorecardresearch

धोनीची भूमिका निभावण्यासाठी सज्ज! अखेरच्या षटकांत अधिक जबाबदारीने खेळण्याची हार्दिक पंडय़ाची तयारी

‘‘मला षटकार मारायला आवडते. मात्र, आता वय आणि अनुभवानुसार मी अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे.

धोनीची भूमिका निभावण्यासाठी सज्ज! अखेरच्या षटकांत अधिक जबाबदारीने खेळण्याची हार्दिक पंडय़ाची तयारी

अहमदाबाद : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीप्रमाणे विजयवीराची भूमिका बजावताना दडपणाखाली संयम बाळगून भारताला अधिकाधिक मर्यादित षटकांचे सामने जिंकवून देण्याची आपली तयारी असल्याचे अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने म्हटले आहे.

२९ वर्षीय हार्दिक आक्रमक शैलीतील फलंदाजीसाठी आणि मोठय़ा फटक्यांसाठी ओळखला जातो. मात्र, धोनीचे अनुकरण करून आता सामना अखेपर्यंत नेण्याचा, समोरील बाजूचा फलंदाज लयीत असल्यास त्याला फलंदाजीची अधिक संधी देण्याचा आणि वेळ पडल्यास संयमी फलंदाजी करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे हार्दिक म्हणाला.

‘‘मला षटकार मारायला आवडते. मात्र, आता वय आणि अनुभवानुसार मी अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे. आयुष्याचा हा एक भागच आहे. मी केवळ स्वत:पुरता विचार करणे योग्य नाही. इतर फलंदाजांसोबत मोठय़ा भागीदारी रचण्यावर आता माझा भर असतो. माझ्या संघाला आणि मी ज्या खेळाडूसोबत फलंदाजी करतो आहे, त्याला आत्मविश्वास देण्याचा माझा प्रयत्न असतो,’’ असे भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार हार्दिकने सांगितले.

‘‘सध्याच्या ट्वेन्टी-२० संघात मी सर्वात अनुभवी खेळाडू आहे. मी सर्वाधिक सामने खेळलो आहे. त्यामुळे या अनुभवाचा माझ्यासह इतरांना फायदा होणे गरजेचे आहे. मी विविध परिस्थितींमध्ये फलंदाजी केली आहे. त्यामुळे दडपण कसे हाताळायचे, अवघड परिस्थितीत कशी फलंदाजी करायची हे मला ठाऊक आहे. संघातील इतर खेळाडूंनाही दडपणात संयम कसा बाळगायचा हे शिकण्याचाप्रयत्न करत आहे,’’ असेही हार्दिक म्हणाला. अखेरच्या षटकांत संयमाने फलंदाजी करताना भारताला सामने जिंकवून देण्यात धोनीचा हातखंडा होता. धोनी निवृत्त झाल्यानंतर हार्दिकने ही जबाबदारी स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. ‘‘अखेरच्या षटकांत अधिक जबाबदारी घेण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी धावगती आता कदाचित पूर्वीपेक्षा कमी होईल. मात्र, नवी संधी किंवा नवी भूमिका बजावण्यासाठी मी कायमच उत्सुक असतो. अखेरच्या षटकांत संयमाने फलंदाजी करणे, सामना अखेरच्या षटकापर्यंत नेणे ही धोनीची भूमिका निभावण्याची आता माझी तयारी आहे,’’ असे हार्दिकने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 03:32 IST