Virat Kohli On Sanju Samson: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार रंगला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ९६ धावांनी विजय मिळवून जेतेपदाचा मान मिळवला. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने लागोपाठ दुसऱ्यांदा, तर एकूण तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचा मान पटकावला. या वर्ल्डकप विजयानंतर विराट कोहलीने संजू सॅमसनसाठी एक खास स्टोरी शेअर केली आहे .
संजू सॅमसनने गेल्या ३ सामन्यात लागोपाठ ३ अर्धशतकं झळकावली. त्यामुळे महत्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली. अंतिम सामन्यात फलंदाजी करताना त्याने ८९ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या बळावर त्याची प्लेअर ऑफ ट टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली. विराटने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर संजू सॅमसनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “या स्पर्धेतील सर्वात जास्त पात्र खेळाडू, संजू सॅमसनसाठी ही स्पर्धा खास ठरली. जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती, त्यावेळी तू उत्तम कामगिरी केलीस. चेट्टा, तुझ्यासाठी मला मनापासून खूप आनंद होत आहे.” चेट्टा या शब्दाचा अर्थ भाऊ असा होतो.
यासह भारतीय संघासाठी विराटने एक खास पोस्ट शेअर केली होती. विराटने संघाचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करत लिहिले की, “आम्ही पुन्हा एकदा चॅम्पियन बनलो. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आम्ही दमदार विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत दबाव असूनही मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि या प्रतिभावान संघासमोर कोणीही टिकू शकले नाही. या शानदार कामगिरीत योगदान दिल्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट टीम आणि सपोर्ट स्टाफचे हार्दिक अभिनंदन. हा विजय खरोखरच कौतुकास्पद आहे. जय हिंद.”
भारताचा दमदार विजय
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर २५५ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून संजू सॅमसनने ८९ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्मा आणि इशान किशनने दमदार अर्धशतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ९६ धावांनी आपल्या नावावर केला.
