भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवर आहे ‘ओडिशा’चं नाव, जाणून घ्या त्यामागचं कारण

भारतीय हॉकीचं वैभव परत आणण्यासाठी ओडिशा प्रयत्नशील

tokyo 2020 behind hockey success odishas support over the years
टीम इंडिया आणि ओडिशा सरकारचं कनेक्शन
भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठली. तर पुरुष हॉकी संघाने ४९ वर्षांनंतर हा पराक्रम केला. राष्ट्रीय संघाचा प्रायोजक म्हणून २०१८ पासून ओडिशा सरकार भारताच्या राष्ट्रीय हॉकी संघाशी (पुरुष-महिला, कनिष्ठ-वरिष्ठ दोन्ही) जोडलेले आहे. भारतीय हॉकीचे वैभव परत आणण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला आणि टोक्यो ऑलिम्पिकमधील या यशामुळे हा उपक्रम बऱ्याच प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे.

ओडिशात हॉकी हा क्रीडा संस्कृतीचा एक भाग

राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये ओडिशाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि त्याच्या राज्यातील अनेक खेळाडू भारतीय संघात प्रतिनिधित्व करतात. सध्या पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार बीरेंद्र लाकडा आणि महिला संघाची दीप ग्रेस एक्का ओडिशाची आहे. ओडिशात हॉकी हा क्रीडा संस्कृतीचा एक भाग आहे आणि राज्यातील लोकांनाही हा खेळ खूप आवडतो. तसेच हॉकीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचाही नेहमी पुढाकार असतो.

 

 

 

ओडिशाने २०१८ मध्ये सहारा गेल्यावर संघाला प्रायोजकत्व दिले. १५० कोटी रुपये आणि पाच वर्षाच्या करारावर हे प्रायोजकत्व होते. त्या सगळ्याच्या बळावर हॉकीने कात टाकली. २०१८मध्ये, टाटा समूहाच्या सहकार्याने, राज्य सरकारने कलिंगा स्टेडियममध्ये हॉकी हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना केली. यात १२ केंद्रे आहेत, ज्यात २,५००पेक्षा जास्त तरुण प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जात आहे.
राज्यातील २० क्रीडा वसतिगृहांपैकी सुंदरगडमधील दोन हॉकीसाठी समर्पित आहेत. राज्य सरकार आता जिल्ह्यातील सर्व १७ ब्लॉक्समध्ये १७ एस्ट्रो टर्फ स्थापन करण्याचे काम करत आहे.

हेही वाचा – Olympic Hockey: “आम्ही लढणार”, सुवर्णपदकाचं स्वप्न भंगल्यानंतर मनदीप सिंगचं भारतीयांना आश्वासन

“सिंथेटिक टर्फ्स येईपर्यंत भारताचे हॉकीवर वर्चस्व होते. आमच्या मुलांनी सिंथेटिक टर्फवर खेळणे सुरू करणे महत्वाचे आहे. त्यामुळे २० हॉकी प्रशिक्षण केंद्रांसाठी आम्ही २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. राज्य लहानपणापासूनच क्रीडा विज्ञानावर आधारित व्यावसायिक प्रशिक्षण देईल”, असे ओडिशा सरकारमधील क्रीडा आणि युवा विभागाचे सचिव विनील कृष्णन म्हणाले.

ओडिशा हे एकमेव राज्य आहे, जे…

ओडिशा हे एकमेव राज्य आहे, जे राष्ट्रीय संघाचे अधिकृत प्रायोजक आहे. ओडिशाने हॉकी इंडिया फेडरेशनच्या भागीदारीत भुवनेश्वरमध्ये अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यात पुरुष वर्ल्ड कप, वर्ल्ड लीग, प्रो लीग, ऑलिम्पिक क्वालिफायर्सचाही समावेश आहे. सततच्या पाठिंब्यामुळे भारतीय संघांची चांगली कामगिरी सुनिश्चित झाली आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघांनी आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा पदक मिळवण्याचे भारतीय हॉकी संघाचे स्वप्न दूर दिसत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reason behind odishas name on the jersey of the indian hockey team adn