‘आयसीसी’च्या विश्वचषकसंबंधी नियमांचा आढावा घेण्याची आवश्यकता असून शक्य झाल्यास त्यामध्ये फेरबदलही करावा, असा सल्ला न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिला.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक सीमापार फटक्यांच्या वादग्रस्त नियमामुळे न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्टेड यांना अतिशय दु:ख झाले असून त्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. स्टेड म्हणाले, ‘‘१०० षटकांचा पूर्ण सामना खेळल्यानंतर समान धावा करूनही विजेतेपद गमावल्यामुळे मी फार निराश झालो आहे. क्रिकेट हा एक रहस्यमय खेळ आहे आणि विश्वचषकाचा अंतिम सामना त्याचे उत्तम उदाहरण आहे. परंतु या खेळाच्या तांत्रिक नियमांवर नक्कीच विचार केला जाऊ शकतो.’’

‘‘विश्वचषकाचे नियम लिहिताना ‘आयसीसी’ने कधी विचारही केला नसेल की अंतिम सामन्याचा अशा प्रकारे निकाल लागू शकतो. त्यामुळे या नियमांचा आढावा घेण्याची आवश्यकता असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून त्यामध्ये बदल करणे योग्य ठरेल,’’ असे स्टेड म्हणाले.

याव्यतिरिक्त, बेन स्टोक्सच्या बॅटला लागून गेलेल्या चौकाराच्या पाचऐवजी सहा धावा देणाऱ्या पंचांच्या चुकीविषयी विचारले असता स्टेड म्हणाले, ‘‘खरे तर मलाही या नियमाविषयी माहिती नव्हती, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असतो. शेवटी तोसुद्धा माणूस आहे आणि चुका या खेळाचा अविभाज्य घटक आहेत,’’ असे ४७ वर्षीय स्टेड यांनी सांगितले.