मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामासाठी शुक्रवारी मुंबईत झालेल्या लिलाव प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पवन शेरावतवर दोन कोटी, २६ लाख रुपयांची विक्रमी बोली लागली. यू मुंबाशी बोलीयुद्ध जिंकत तमिळ थलायव्हाजने त्याला आपल्या संघात सामील केले.

लिलावाच्या पहिल्या दिवशी झालेल्या अ-गटाच्या लिलावात अपेक्षेप्रमाणेच तीन खेळाडूंनी एक कोटी रुपयांचा आकडा पार केला. विकास खंडोलाला बंगळूरु बुल्सने एक कोटी, ७० लाख रुपये मोजत ताफ्यात घेतले. प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात प्रदीपसाठी एक कोटी, ६५ लाखांची विक्रमी बोली लागली होती. तो विक्रम पवन व विकास यांनी मोडीत काढला.

 पुणेरी पलटणने इराणचा डावा कोपरारक्षक फझल अत्राचालीवर एक कोटी, ३८ लाख रुपयांची, तर अष्टपैलू मोहम्मद ईस्माइल नबीबक्षसाठी ८७ लाखांची बोली लावली. यू मुंबाने ब-गटातील गुमान सिंगवर एक कोटी, २२ लाखांची बोली लावली. प्रदीप नरवाल आणि सुनील कुमार यांना प्रत्येकी ९० लाख रुपयांना अनुक्रमे यूपी योद्धाज आणि जयपूर पिंक पँथर्स यांनी संघात स्थान दिले. संदीप नरवालला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.