मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा सवाल

इंग्लंडमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. इंग्लंड दौऱ्यात अगदी पहिल्या दिवसापासूनच काहीही होऊ शकले असते. मग पुस्तक प्रकाशनास दोष कशाला, असा सवाल भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विचारला आहे.

शास्त्री यांनी १ सप्टेंबरला लंडन येथे झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांच्यासह अन्य दोन मार्गदर्शकांचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. मात्र, या गोष्टीचा पाचवा कसोटी सामना रद्द होण्याशी संबंध जोडणे चुकीचे ठरेल, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीदरम्यान शास्त्री, भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे त्यांना आणि फिजिओ नितीन पटेल यांना विलगीकरणात राहावे लागले. काही दिवसांनी भारतीय संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांनाही करोनाची बाधा झाली. त्यामुळे चिंतेत असलेल्या भारतीय खेळाडूंनी मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. अखेर हा सामना रद्द करावा लागला. मात्र, भारतीय संघाच्या या निर्णयासाठी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोष देता येणार नाही, अशी भूमिका शास्त्री यांनी घेतली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेले इंग्लंडमधील निर्बंध १९ जुलै रोजी उठवण्यात आले होते.

‘आयपीएल’साठी कसोटी सामना रद्द; वॉनची टीका

लंडन : ‘आयपीएल’ आणि त्याद्वारे मिळणाऱ्या पैशासाठी भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द करावी लागली, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले. ‘‘करोनाची लागण झाल्यास ‘आयपीएल’ला मुकावे लागेल, ही भीती खेळाडूंमध्ये होती. त्यामुळेच कसोटी रद्द करण्यात आली. त्यामुळे हे सर्व काही ‘आयपीएल’ आणि त्यामधून मिळवणाऱ्या पैशासाठी घडले, हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवे,’’ असे वॉनने म्हटले आहे.‘‘आठवड्याभरात ‘आयपीएल’मध्ये हे खेळाडू आनंदाने खेळताना दिसतील. परंतु त्यांनी करोना ‘आरटी-पीसीआर’ चाचण्यांवर विश्वास ठेवायला हवा होता,’’ असे वॉन यावेळी म्हणाला.