Micheal Vaughan On Hardik Pandya: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. पण हार्दिक पंड्या कर्णधार बनल्यापासून हा संघ एक एक विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेतही मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकलेला नाही. आतापर्यंत झालेल्या १३ सामन्यांपैकी ९ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सुपर फ्लॉप कामगिरीनंतर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्समधून रिलीज करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
हार्दिक पंड्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघापासूनच केली होती. त्यानंतर तो गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बनला. त्याने पहिल्याच हंगामात गुजरातला चॅम्पियन बनवलं. तर दुसऱ्या हंगामात गुजरातला अंतिम फेरीत पोहोचवलं. त्यानंतर २०२४ मध्ये तो मुंबई इंडियन्स संघात पुन्हा परतला. यावेळी त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यारदरम्यान मुंबईचा संघ केवळ एकदाच प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याला रिलीज करण्याची आणि कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
यादरम्यान इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी आगळावेगळा सल्ला दिला आहे. क्रिकबझच्या एका शो मध्ये बोलताना मायकल वॉन म्हणाले, “त्याला (हार्दिकला) रिलीज करा आणि कॅमरुन ग्रीनसोबत रिप्लेस करा. जर त्याला कर्णधारपदच हवं असेल, तर त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघात जावं, कारण कोलकाता नाईट रायडर्स संघाला नव्या कर्णधाराची गरज आहे. त्यामुळे ग्रीन आणि हार्दिक यांच्यात ट्रेड करा.”
कॅमेरून ग्रीनदेखील आधी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. पण मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २५.२० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. जर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये हार्दिकसाठी ट्रेड झाला, तर त्याला देखील मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. हार्दिक गुजरातसाठी चांगली कामगिरी करत होता, त्याला परत इथे का आणलं, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे, असं मायकल वॉन म्हणाले.
