मुंबई इंडियन्स हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक संघ आहे. या संघाची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे. संघ मालकीच्या निमित्त रिलायन्सने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आजतागायत क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. हे अस्तित्व आणखी बळकट करण्यासाठी रिलायन्सने आणखी दोन देशांमध्ये क्रिकेट संघ विकत घेतले आहेत.

‘इंडियन प्रीमियर लीग’ या क्रिकेट स्पर्धेची लोकप्रियता बघता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने स्वत:ची स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी संघांची लिलाव प्रक्रिया संपली आहे. हे सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलमधील संघ मालकांनी विकत घेतले आहेत. त्यामध्ये रिलायन्सचाही समावेश आहे. रिलायन्सने केपटाऊनचा संघ खरेदी केला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी यांनी नवीन केपटाऊन संघाचे रिलायन्स समुहात स्वागत केले. त्या म्हणाल्या, “आमच्या नवीन टी २० संघाचे रिलायन्स कुटुंबात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मुंबई इंडियन्सचा सशक्त आणि मनोरंजक क्रिकेट ब्रँड दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात घेऊन जाण्यास आम्ही उत्सुक आहोत. दक्षिण आफ्रिकादेखील भारतीयांइतकाच क्रिकेटवर प्रेम करतो. मुंबई इंडियन्सचा जागतिक क्रिकेटमध्ये आपले अस्तित्व आणखी ठळक करत आहे. त्यामुळे आमची बांधिलकीही वाढत आहे.”

हेही वाचा – South Africa T20 League : आता आफ्रिकेतही वाजणार आयपीएल फ्रँचायझींचा डंका; टी २० लीगमधील सर्व संघ केले खरेदी

रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेच्या फ्रँचायझीसह, आमच्याकडे आता तीन देशांतील टी २० संघांची मालिकी आली आहे. आम्ही क्रिकेट इकोसिस्टम आणि मुंबई इंडियन्समधील आमच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून चाहत्यांना आम्ही सर्वोत्तम क्रिकेट देऊ शकू.”

कंपनीच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून कंपनीने क्रिकेट फ्रँचायझी, फुटबॉल लीग, क्रीडा प्रायोजकत्व, मेंटॉरशिप आणि अॅथलीट टॅलेंट मॅनेजमेंटमध्ये एक चांगली इको-सिस्टम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.