इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सचा संघ खरेदी करून रिलायन्सने क्रिकेटमध्ये आपला चांगला जम बसवला आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही दोन क्रिकेट संघ खरेदी केले आहेत. आता अंबानींची नजर इंग्लंडमधील लीग क्रिकेटवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ही चर्चा सुरू झाली आहे.

सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ क्रिकेट लीग सुरू आहे. भारताचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री ‘स्काय स्पोर्ट्स’साठी या लीगमध्ये समालोचन करत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर मुकेश अंबानी आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्यासह एक फोटो पोस्ट केला आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरील हा फोटो आहे. ‘क्रिकेट आवडणाऱ्या लोकांसोबत’, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.

हा फोटो बघून रिलायन्स आता इंग्लंडमधील लीग क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचारात आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) २०२२मध्ये क्रिकेटचा एक नवीन फॉरमॅट सुरू केला आहे. या फॉरमॅटसह इंग्लंडने ‘द हंड्रेड’ नावाची लीग सुरू केली आहे. सध्या या लीगचा दुसरा हंगाम सुरू आहे. एका सामन्यात प्रत्येक डावामध्ये फक्त १०० चेंडूंचा खेळ होतो. म्हणून त्याला ‘द हंड्रेड’, असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा – ट्रेंट बोल्टचा धक्कादायक निर्णय; न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार

या लीगला इंग्लंडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, डेव्हिड मिलर, आंद्रे रसेल आणि अॅडम झाम्पा यांसारखे मर्यादित षटकांसाठी प्रसिद्ध असलेले खेळाडू या लीगमध्ये खेळले आहेत.