Bangladeshi Cricketer in IPL: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून तेथील अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. दोन आठवड्यात दोन हिंदू तरूणांची जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याचे पडसाद भारतात उमटले असून दिल्लीतील बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू संघटनांनी तीव्र आंदोलन केले होते. यानंतर आता एका धार्मिक नेत्याने थेट आयपीएलचे सामने उधळून लावण्याची धमकी दिली आहे. बांगलादेशी खेळाडू भारतात खेळले तर त्या मैदानावरील खेळपट्टी उखडू असा इशारा देण्यात आला आहे.
बांगलादेशमध्ये फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्याआधी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला आहे. हिंदूंवर हिंसक हल्ले होत असून बांगलादेशमधील कोट्यवधी अल्पसंख्याक भीतीच्या सावटाखाली आहेत. दीपू चंद्र दास आणि अमृत मोंडल नामक दोन तरूणांचे लिंचिंग झाल्यानंतर भारतात संताप व्यक्त केला जात आहे.
अशी परिस्थिती असताना आता उज्जैनमधील रिंमुक्तेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांच्यासह काही साधूंनी एकत्र येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जर बांगलादेशी खेळाडू आयपीएलसाठी मैदानात खेळण्यास उतरले तर धार्मिक योद्धे मैदानावर चाल करतील. बांगलादेशमध्ये एकाबाजूला हिंदूंचा छळ होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची परवानगी देऊ नये, तसेच इतर धार्मिक नेत्यांनीही यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्य पुजाऱ्यांनी केले आहे.
मुस्तफिजूर रहमानमुळे केकेआरवर बहिष्काराचा इशारा
नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यांच्यावर कोलकाता नाइट रायडर्सने ९.२० कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतले. मात्र आता अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनंतर केकेआर संघावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे.
मुस्तफिजूर रहमान २०१६ साली आयपीएलमध्ये सहभागी झाला. आजवर पाच आयपीएल संघामधून ६० सामने खेळला आहे. यात त्याला ६५ विकेट मिळाल्या आहेत. मागच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून केवळ तीनच सामने खेळू शकला होता. यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या.
बांगलादेशकडून खेळताना मुस्तफिजूर रहमानने एकूण १५ कसोटी, ११६ वनडे आणि १२६ टी२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ३१, वनडेमध्ये १७७ आणि टी२० फॉरमॅटमध्ये १५८ विकेट्स घेतल्या आहेत.
