नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील महिलांमध्ये १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जेतेपद पटकावले. याचप्रमाणे एकाच दिवशी तीन पदके जिंकणाऱ्या हरयाणाच्या शिखा नरवालने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रीय निवड चाचणीत ऑलिम्पिकपटू सौरभ चौधरीने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात, तर नौदलाचा अनुभवी नेमबाज ओंकार सिंग याने २५ मीटर सेंटर फायर पिस्तूलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय निवड चाचण्या पूर्ण होण्यास आणखी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून, बुधवारी याची पात्रता फेरी पार पडली. यामध्ये पदकांच्या फेरीत अभिज्ञाने ५७६ गुणांची कमाई करत अव्वल आठमध्ये आघाडी घेतली आहे. ती आता शिखाबरोबर सुवर्णपदकासाठी सामना करणार आहे. अभिज्ञाने डॉ. करणी सिंग हिचा १६-१४ असा पराभव करत विजय मिळविला.