२०११ विश्वचषकाच्या अंतिम लढतीच्या विक्री न झालेल्या ‘त्या’ ४०५ तिकिटांबाबतच्या तपशिलाचा अहवाल एमसीएच्या माजी अध्यक्ष दिवंगत विलासराव देशमुख यांना सादर केल्याचे बीसीसीआयचे क्रिकेट विकास अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. ‘‘या संदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशन करत असलेला तपास योग्यच आहे. स्टेडियम पूर्ण भरलेले होते, मात्र काही तिकिटे विक्रीविना राहिलेली होती. याचे प्रमुख कारण म्हणजे पोलिसांव्यतिरिक्त स्वयंसेवक आणि अधिकारी यांच्यासाठी ५,००० यांच्यासाठी राखीव मान्यतापत्र होती आणि हे सर्व जण सामन्याला उपस्थित होते. ४०५ विक्री न झालेल्या तिकिटांबाबतचा अहवाल विलासराव देशमुखांना मी सादर केला होता. ही तिकिटे का विकली गेली नाहीत याबाबत मी माहिती दिली होती. हीच गोष्ट आता तपास करणाऱ्या समितीला मी सांगितली आहे,’’ असे शेट्टी यांनी सांगितले.
 या प्रकरणी तपास होत आहे ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे त्यांना प्रश्नांची उकल करता येईल. मोफत तिकिटांच्या वितरणासाठी काय व्यवस्था आहे या संदर्भात उपाययोजना करता येईल. एका अर्थाने ही चौकशी संघटनेसाठी उपयुक्त आहे, असे शेट्टी यांनी पुढे सांगितले.
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी तिकिटे संपल्याचे प्रेक्षकांना सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ४०५ तिकिटे विकलीच गेली नसल्याचे उघड झाले. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एमसीएने चारसदस्यीय विशेष समितीची नियुक्ती केली.