भारतीय क्रिकेटपटूंभोवतीचं दुखापतीचं सत्र चिंताजनक आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत सेंटर ऑफ एक्ललन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना काही खेळाडू प्रायव्हेट ट्रेनरची मदत घेत आहेत याबाबत विचारलं गेलं. या प्रश्नाने लक्ष्मण अवाक झाले. दुखापती आणि त्याचं व्यवस्थापन ही स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग टीमची जबाबदारी आहे असं लक्ष्मण यांनी स्पष्ट केलं.
‘प्रायव्हेट ट्रेनर हा विषय मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. माझ्यासाठी तरी हा प्रकार नवीन आहे. दुखापतींच्या निमित्ताने अनेक बातम्या समोर येत आहेत. करारबद्ध खेळाडूंच्या दुखापती आणि त्याचं व्यवस्थापन याची जबाबदारी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग टीमची आहे. वयोगट स्पर्धांमधील खेळाडूंच्या दुखापतीकडेही त्यांचं लक्ष असतं’, असं लक्ष्मण म्हणाले.
‘खेळाडूंच्या प्रत्येक सराव सत्राचीही नोंद ठेवली जाते. म्हणूनच आम्ही जीपीएस सुविधा वापरतो. खेळाडू काय खातोय, कसा सराव करतोय याकडे काटेकोर लक्ष असतं. प्रत्येक खेळाडूचं आरोग्य, दुखापती यांची शिस्तबद्ध नोंद ठेवली जाते. भारतीय संघाला अतिशय अनुभवी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच मिळाले आहेत. अॅड्रियन जागतिक दर्जाचा ट्रेनर आहे. २००२ मध्ये मी संघाचा भाग असताना तो ट्रेनर होता. त्याच्या कार्यपद्धतीबद्दल आणि दर्जाबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. महिला संघाची जबाबदारी निककडे आहे. तोही चांगलं काम करत आहे. खेळाडूंना फिट कसं ठेवायचं याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग टीम आणि खेळाडू यांच्यात सुसंवाद आहे. यापल्याड काही चर्चा असेल तर माझ्यासाठीही ती बातमीच आहे.
सेंटर ऑफ एक्लसन्स मध्ये खेळाडू दाखल झाल्यानंतर काय शास्त्रोक्त प्रक्रिया राबवली जाते याची माहिती लक्ष्मण यांनी दिली. ‘खेळाडूला नेमकी काय दुखापत झाली आहे, कशामुळे झाली आहे, ती बरी होण्यासाठी किती कालावधी लागेल, त्यासाठी कोणत्या तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल याची माहिती घेतली जाते. त्याला रिहॅब योजना समजावून देण्यात येते. डॉ. दिनशॉ पारडीवाला हे स्ट्रेस फ्रॅक्चरसंदर्भात ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत. डॉ. किणी पायाशी संबंधित दुखापतींसाठी मार्गदर्शन करतात. डॉ. वॉरियर हात आणि मनगटाला होणाऱ्या दुखापतींसंदर्भात मार्गदर्शन करतात. इंग्लंडमध्ये स्थित एक डॉक्टर घोट्याशी संबंधित उपचारांची जबाबदारी घेतात. स्पोर्ट्स हर्नियासंदर्भात काही असेल तर म्युनिकमध्ये डॉक्टर आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या एका डॉक्टरांशीही आम्ही नियमित संपर्कात असतो’, असं लक्ष्मण म्हणाले.
‘क्लिनिकल, फिजिकल आणि स्किल फेझ अशा तीन टप्प्यात रिहॅब प्रक्रिया चालते. स्कॅन रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे हे विषद करण्याकरता तीन डॉक्टर आहेत. डॉक्टर, फिजिओ, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग टीम आणि खेळाडू अशा सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न असतात. घाईघाईने पुनरागमन केल्यास दुखापत पुन्हा बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे स्किल पार्टकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जातं. मॅच फिट होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. सगळ्या खेळाडूंचा डेटाबेस आमच्याकडे आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी पूरक असा आहार सुचवला जातो’, असं लक्ष्मण यांनी सांगितलं.
भारतीय संघ दोन टेस्टच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. मात्र संघाला दुखापतींनी वेढा दिला आहे. भारतीय संघातील एकूण १३ खेळाडू विविध दुखापतींनी ग्रस्त आहेत आणि बंगळुरुत सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅब प्रक्रियेचा भाग आहेत. एवढे खेळाडू एकदम दुखापतग्रस्त झाल्याने सेंटर ऑफ एक्सलन्स, त्याचे प्रमुख लक्ष्मण आणि भारतीय संघव्यवस्थापन टीकेच्या केंद्रस्थानी आहेत.
दुखापतींसाठी दोषारोप नको
सध्याचे खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळतात. टी२०च्या आगमनानंतर स्पर्धांची संख्या प्रचंड वाढली आहे. सब्जेक्ट टू फिटनेस याचा अर्थ खेळाडू रिहॅब प्रक्रियेचा भाग आहे. मानवी शरीर हे मशीन नाहीये. एखादी दुखापत बरी व्हायला १४ ते २८ कितीही दिवस लागू शकतात. यासंदर्भात कोणीच अचूक भाकीत वर्तवू शकत नाही. त्यामुळे दुखापतींसाठी कोणावरच दोषारोप करायला नको. दुखापतींसाठी कोणाला तरी बळीचा बकरा करायला नको.
