scorecardresearch

धक्कादायक..! रवींद्र जडेजा घेणार निवृत्ती; लवकरच होणार अधिकृत घोषणा!

जागतिक क्रिकेटमध्ये जडेजा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो.

Reports cricketer ravindra jadeja might retire from test cricket
रवींद्र जडेजा

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीदरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला होता. आता त्याच्या दुखापतीदरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जडेजा क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार, अशी बातमी समोर आली आहे.

जागरण आणि स्पोर्ट्स कॅफे यांच्या वृत्तानुसार, जडेजा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्यासाठी कसोटीतून निवृत्त होणार असल्याचे वृत्त आहे. जडेजा न्यूझीलंडविरुद्ध संपलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग होता. कानपूर कसोटी सामन्यात त्याने श्रेयस अय्यरसोबत संघाला संकटातून बाहेर काढताना शानदार भागीदारी केली, तसेच शानदार गोलंदाजी केली. मात्र, पहिल्या सामन्यात शानदार खेळ केल्यानंतर दुखापतीमुळे तो मुंबई कसोटी सामन्यातून बाहेर पडला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून तो बाहेर आहे. जडेजाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यास त्याला चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी जयंत यादवला जागा मिळाली आहे. जडेजाची दुखापत गंभीर असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. रवींद्र जडेजाच्या एका सहकारी क्रिकेटर मित्राने सांगितले, ”तो एकदिवसीय, टी-२० आणि आयपीएल कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी कसोटी सोडू शकतो.”

हेही वाचा – ‘‘नवा क्लास टीचर…”, लक्ष्मणनं घेतली द्रविडची जागा; कामाचा पहिला दिवस गेला ‘असा’; पाहा PHOTO

जडेजावर शस्त्रक्रिया झाल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासूनही दूर राहू शकतो. श्रीलंकेचा संघ भारतीय दौऱ्यावर दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या आयपीएल २०२२मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे. पुढील मोसमासाठी चेन्नईने त्याला कर्णधार महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त पसंती दिली आहे. तो धोनीनंतर सीएसकेचा पुढचा कर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reports cricketer ravindra jadeja might retire from test cricket adn