T20 विश्वचषकाआधीच राहुल द्रविडने BCCI ला दिला मोठा धक्का; ‘या’ गोष्टीसाठी कळवला नकार

१७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये टी २० विश्वचषक स्पर्धा पार पडणार असून त्याआधीच द्रविडने हा धक्का दिलाय.

BCCI Dravid
बीसीसीआयनेच द्रविडकडे केली होती यासंदर्भातील विचारणा

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने भारतीय क्रिकट नियमन मंडळ म्हणजेच बीसीसीआयचं टेन्शन वाढवलं आहे. टी २० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच बीसीसीआय सध्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींनंतर योग्य व्यक्ती कोण असेल याचा शोध घेत आहे. याचसंदर्भात बीसीसीआयने राहुल द्रविडला प्रशिक्षक पदासाठी एक ऑफर दिलेली. मात्र द्रविडने या ऑफरला नम्रपणे नाकार देत बीसीसीआयला मोठा धक्का दिलाय. भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासंदर्भात करण्यात आलेली विनंती द्रविडने नाकारलीय. सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असणारे रवी शास्त्री यांनी टी २० विश्वचषक स्पर्धा ही आपली प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असेल असं जाहीर केल्यानंतर बीसीसीआयकडून द्रविडला या पदासाठी विचारणा करण्यात आलेली. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.

शास्त्री यांच्यासोबतच भारतीय संघाच्या सपोर्टींग स्टाफमधील अनेकजण आपलं पद सोडणार आहे. यामध्ये गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण शिकवणारे आर. श्रीधर यांचाही समावेश आहे. तसेच प्रशिक्षकांपैकी एक असणाऱ्या निक वेब यांनीही टी २० विश्वचषकानंतर पद सोडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता पर्याय म्हणून आता पासूनच नवीन प्रशिक्षकांचा शोध बीसीसीआयने सुरु केलाय. त्याचाच भाग म्हणून बीसीसीआयकडून राहुल द्रविडला या पदासाठी अर्ज करण्याची विनंती करण्यात आलेली. मात्र द्रविडने ही विनंती फेटाळून लावली आहे.

४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहत आहे. तसेच तो १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहण्याचा प्राधान्य दिलं आहे. यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला अधिक रस असल्याचं सांगत द्रविडने मुख्य संघाला प्रशिक्षण देण्याऐवजीन तरुण खेळाडूंना तयार करण्यासाठी क्रिकेट अकदामीमध्येच काम करण्याला प्राधान्य दिलं होतं. आजही द्रविडची तीच भूमिका कायम आहे.

मागील अनेक वर्षांपासून द्रविडच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडू तयार होत आहे. भारतीय संघाला सातत्याने नवीन नवीन खेळाडू उपलब्ध करुन देण्यासाठी कमी वयातील क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करण्याचं काम द्रविड करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Reports rahul dravid politely refuses bcci offer for india coach scsg

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी