युक्रेनची मुसंडी!

साखळी फेरीत जेमतेम एक सामना जिंकता आलेल्या युक्रेनने बाद फेरीत मात्र आपली ताकद दाखवून दिली.

स्वीडनला नमवून प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत मजल

राखीव खेळाडू आर्तेम डोव्हबिक याने अतिरिक्त वेळेत अखेरची काही सेकंद शिल्लक असताना केलेल्या गोलमुळे युक्रेनने स्वीडनवर २-१ अशी मात करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. फुटबॉलच्या इतिहासात युक्रेनने पहिल्यांदाच युरो चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

साखळी फेरीत जेमतेम एक सामना जिंकता आलेल्या युक्रेनने बाद फेरीत मात्र आपली ताकद दाखवून दिली. ओलेक्झांडर झिनचेंको याने २७व्या मिनिटालाच युक्रेनला आघाडीवर आणले होते. मात्र त्यांना हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. पहिल्या सत्राच्या अखेरीस इमिल फोर्सबर्गने गोल करत स्वीडनला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेचा खेळ संपण्यास काही सेकंद बाकी असताना डोव्हबिक याने हेडरवर शानदार गोल करत युक्रेनला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

डोव्हबिकचा हा युक्रेनसाठीचा पहिला गोल ठरला. डोव्हबिकने गोल साकारल्यानंतर प्रशिक्षक आंद्रिय शेव्हचेंको यांनी खेळाडूंसह आनंदोत्सव साजरा केला. आता शनिवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीसाठी युक्रेन संघ रोमला रवाना होणार आहे.

कर्णधार आंद्रिय यार्मोलेंकोने दिलेल्या पासवर झिनचेंकोने सुरुवातीलाच युक्रेनला आघाडीवर आणले होते. त्यानंतर फोर्सबर्गने यंदाच्या युरो चषकातील चौथा गोल साकारत स्वीडनला बरोबरी मिळवून दिली होती. दुसऱ्या सत्रात स्वीडनने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत खेळवण्यात आला. अतिरिक्त वेळेत यार्मोलेंकोच्या जागी डोव्हबिक याला संधी देण्यात आली. त्यानेच महत्त्वाच्या क्षणी गोल करत युक्रेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

७ ओलेक्झांडर झिनचेंको याने युक्रेनसाठी सात सामन्यात गोल केले आहेत. त्याने गोल केल्यानंतर युक्रेनने एकही सामना गमावलेला नाही.

१ युक्रेनने पहिल्यांदाच युरो चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याआधी त्यांनी २००६च्या फिफा विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

गेल्या तीन सामन्यांत आमच्या कामगिरीवर प्रचंड टीका झाली. पण टीकाकारांची तोंडे आम्ही बंद करू शकत नव्हतो. त्यांनी आम्हाला पाठिंबा देणे गरजेचे होते. आता उपांत्यपूर्व फेरी गाठल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. –ओलेक्झांडर झिनचेंको, युक्रेन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reserve player artem dubovik euro cup football competitions akp