राजकोट  : वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने अखेरच्या दोन फलंदाजांना झटपट माघारी पाठवल्यानंतर सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने (नाबाद ६३) केलेल्या अर्धशतकामुळे शेष भारत संघाने सौराष्ट्रवर आठ गडी राखून मात करत २९व्यांदा इराणी चषकाचे जेतेपद पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी, सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी ८ बाद ३६८ धावांवरून पुढे खेळणाऱ्या सौराष्ट्रचा दुसरा डाव ३८० धावांत आटोपला. त्यांना केवळ १२ धावांची भर घालता आली. कुलदीप सेनने कर्णधार जयदेव उनाडकट (१३३ चेंडूंत ८९) आणि पार्थ भूत (१६ चेंडूंत ७) यांना बाद करत सौराष्ट्रचा डाव संपुष्टात आणला. सेनने या डावात पाच आणि सामन्यात आठ गडी बाद केले.

विजयासाठी मिळालेले १०५ धावांचे लक्ष्य शेष भारताने ३१.२ षटकांत दोन गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. उनाडकटने प्रियांक पांचाळ (२) आणि यश धूल (८) यांना लवकर बाद करत शेष भारताला अडचणीत टाकले. मात्र, ईश्वरन आणि श्रीकर भरत यांनी ८१ धावांची अभेद्य भागीदारी रचत शेष भारताचा विजय साकारला. ईश्वरनने ७८ चेंडूंत नऊ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ६३ धावांची, तर भरतने ८२ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद २७ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, या सामन्याच्या पहिल्या डावात शेष भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरी केली होती. सौराष्ट्रचा डाव ९८ धावांत गारद केल्यानंतर शेष भारताने ३७४ धावांची मजल मारत २७६ धावांची आघाडी मिळवली होती. मुंबईकर सर्फराज खानचे (१३८) योगदान शेष भारतासाठी महत्त्वाचे ठरले होते. सौराष्ट्रने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. मात्र, अखेरीस त्यांची झुंज अपुरी ठरली.

संक्षिप्त धावफलक

* सौराष्ट्र (पहिला डाव) : ९८

* शेष भारत (पहिला डाव) : ३७४

* सौराष्ट्र (दुसरा डाव) : १०३ षटकांत सर्वबाद ३८० (जयदेव उनाडकट ८९; कुलदीप सेन ५/९४, सौरभ कुमार ३/८०, मुकेश कुमार १/४९)

* शेष भारत (दुसरा डाव) : ३१.२ षटकांत २ बाद १०५ (अभिमन्यू ईश्वरन नाबाद ६३, श्रीकर भरत नाबाद २७; जयदेव उनाडकट २/३७)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rest of india beat saurashtra by eight wickets in irani trophy final zws
First published on: 05-10-2022 at 02:58 IST