राजकोट : सर्फराज खानच्या खेळीनंतर सौरभ कुमारने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे शेष भारत संघाने सौराष्ट्रविरुद्ध इराणी चषकाच्या सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.

पहिल्या डावात २७२ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर सौराष्ट्रची दुसऱ्या डावातही सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्रची २ बाद ४९ अशी स्थिती होती आणि ते अजून २२७ धावांनी पिछाडीवर होते. चिराग जानी ३, तर धर्मेद्रसिंह जडेजा ८ धावांवर खेळत होता. सौराष्ट्रच्या हार्विक देसाई (२०) आणि स्नेल पटेल (१६) या सलामीच्या जोडीला सौरभ कुमारने माघारी पाठवले. सौरभने चार निर्धाव षटके टाकली.

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी शतकी खेळी करणारा सर्फराज दुसऱ्या दिवशी धावसंख्येत फारशी भर घालू शकला नाही. तो १७८ चेंडूंत १३८ धावा करून बाद झाला. त्यानंतर सौरभने फलंदाजीत चमक दाखवताना १० चौकारांसह ७८ चेंडूंत ५५ धावांची खेळी केली. सौरभने जयंत यादवच्या (३७) साथीने सातव्या गडय़ासाठी ७१ धावा जोडल्या. अखेर शेष भारताचा पहिला डाव ३७४ धावसंख्येवर संपुष्टात आला. 

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र (पहिला डाव) : ९८

शेष भारत (पहिला डाव) : ११० षटकांत सर्वबाद ३७४ (सर्फराज खान १३८, हनुमा विहारी ८२, सौरभ कुमार ५५; चेतन सकारिया ५/९३)

सौराष्ट्र (दुसरा डाव) : १७ षटकांत २ बाद ४९ (हार्विक देसाई २०; सौरभ कुमार २/०)