एपी, लंडन : ईऑन मॉर्गनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपदही सात वर्षांहून अधिक काळानंतर सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१५च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोनासाठी मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने २०१९ मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. त्याच्या नेतृत्व कारकीर्दीतच इंग्लंड संघाने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात अग्रस्थान पटकावले.

मॉर्गनच्या संघाने गेल्या आठवडय़ात नेदरलँड्सविरुद्ध ४ बाद ४९८ अशी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या तीन सर्वोच्च धावसंख्या या मॉर्गनच्याच इंग्लंड संघाच्या नावावर आहेत. गेल्या दीड वर्षांत पस्तिशीच्या मॉर्गनची तंदुरुस्ती आणि लय ढासळल्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

‘‘हा निर्णय सोपा नव्हता. परंतु हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते,’’ असे मॉर्गनने सांगितले. २०१०मध्ये इंग्लंडने ट्वेन्टी-२० क्रिकेटचे विश्वचषक जिंकले. या संघातही मॉर्गनचा समावेश होता. मॉर्गन इंग्लंडकडून सर्वाधिक एकदिवसीय (२२५) आणि ट्वेन्टी-२० (११५) सामने खेळला आहे. याचप्रमाणे याच प्रकारातील सर्वाधिक धावासुद्धा त्याच्या खात्यावर आहेत.

मॉर्गनची कारकीर्द

प्रकार   कसोटी  एकदिवसीय  ट्वेन्टी-२०

सामने  १६  २४८ ११५

धावा   ७०० ७,७०१  २,४५८

शतके   २   १४  ०

अर्धशतके   ३  ४७     १४

सर्वोच्च १३०    १४८    ९१

झेल    ११     ८७     ४६

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired eoin morgan international from cricket england ysh
First published on: 29-06-2022 at 00:01 IST