Richa Ghosh Stunning Catch in Lords test Video: भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटीत २७० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं. १४२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आला आणि या पहिल्याच सामन्या विजय मिळवण्याचा विक्रम भारतीय संघाने केला आहे. भारताने सांघिक कामगिरीच्या बळावर हा विजय मिळवला. या सामन्यातील रिचा घोषच्या कॅचने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

भारताची यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषनेही भारताच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली. रिचाने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं. रिचाचं अर्धशतक पूर्ण होताच भारताने ४५६ धावांवर डाव घोषित केला. यास्तिका भाटिया प्लेईंग इलेव्हनचा भाग असल्याने यष्टीरक्षणाची जबाबदारी तिच्याकडे देण्यात आली होती आणि रिचा घोष सिली पॉईंटवर तैनात होती. स्नेह राणाच्या गोलंदाजीवर रिचाने जबरदस्त झेल टिपला. रिचाच्या या झेलचा व्हीडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

रिचा घोषने टिपलेला लॉर्ड्स कसोटीतील कॅचचा व्हीडिओ पाहिलात का?

फिरकीपटू स्नेह राणाच्या गोलंदाजीवर ‘सिली पॉइंट’ला अत्यंत खतरनाक झेल टिपत रिचा घोषने मॅडी व्हिलियर्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्नेहने ऑफ-स्टंपच्या अगदी बाहेर ‘गुड लेंथ’वर चेंडू टाकला होता; व्हिलियर्सने पुढे सरसावून जोरदार ‘ड्राइव्ह’ मारला, परंतु चेंडू थेट ‘सिली पॉइंट’च्या दिशेने गेला, जिथे रिचा तैनात होती आणि तिने एक कठीण झेल यशस्वीपणे टिपला.

व्हिलियर्सने मारलेला तो फटका इतका जोरदार होता की चेंडू थेट रिचाच्या उजव्या तळहातात जाऊन बसला. झेल घेताच रिचाला वेदना झाल्या, पण चेंडू मात्र तिने हातातून पडू दिला नाही. झेल टिपल्यानंतर रिचाने वेदनेने आपला हात झटकण्यास सुरुवात केली. रिचाने टिपलेला झेल पाहून मॅडी व्हिलियर्सचा विश्वासच बसेना; ती तब्बल एक मिनिट क्रीजवरच उभी राहिली. सर्वांनी रिचाचा झेल पाहून एकच जल्लोष करायला सुरूवात केली. रिचाने झेल टिपलेला व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दुसऱ्या डावात रिचा घोषने भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील पाचव्या क्रमांकाची सर्वात जलद अर्धशतकी खेळी साकारली. दुसऱ्या डावात रिचा घोषने ५२ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या, ज्यामध्ये तिने आठ चौकार लगावले. भारतीय महिला संघाच्या खेळाडूने केलेलं हे पाचव्या क्रमांकाचं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. रिचाने स्वतःचाच जुना विक्रम सुधारला; यापूर्वी तिने २०२४ मध्ये चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध ५४ चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं.