पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात पंजाबच्या खेळाडूंची फिल्डिंग पाहून सर्वच चाहते संतापले होते. या सामन्यात खेळाडूंनी सलग ३ झेल सोडले आणि ज्याचा संघाला मोठा बसला आहे. संघ जेव्हा लागोपाठ झेल सोडत होता, तेव्हा संघाचे कोच रिकी पॉन्टिंग सामन्यादरम्यान मुलाखत देत होते. ते बोलत असताना अजून एक झेल सुटला आणि रिकी पॉन्टिंग इतके संतापले की ते माईक फेकणार होते.

पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी सलग ड्रॉप झालेल्या कॅच पाहून स्वतःचा संयम कसाबसा सांभाळला. सलग सोडलेल्या झेलमुळे ते स्पष्टपणे निराश दिसत होते. आयपीएल २०२६ हंगामात पंजाबच्या क्षेत्ररक्षणातील त्रुटी पुन्हा एकदा त्यांच्या कामगिरीच्या आड आल्या. अवघ्या तीन षटकांच्या आत कुपर कॉनोली, शशांक सिंग आणि लॉकी फर्ग्युसन यांनी सोपे झेल सोडले आणि त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली.

सलग तिसरा झेल सुटलेला पाहून रिकी पॉन्टिंगने काय प्रतिक्रिया दिली?

सुमारे १० षटकांच्या दरम्यान पॉन्टिंग यांची प्रसारणासाठी मुलाखत घेतली जात होती. त्याच वेळी इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांचे झेल कॉनोली आणि शशांक यांनी सोडले होते. पॉन्टिंग त्या चुका सांगत असतानाच, फर्ग्युसननेही मिड-विकेटवर आणखी एक सोपा झेल सोडला, ज्यामुळे पॉन्टिंग अधिक संतापले. रिकी पॉन्टिंग यांनी सलग तिसरा झेल सुटल्यावर चिडून प्रतिक्रिया दिली, “आता तर मला माईक मैदानात फेकून द्यावासा वाटतो.”

पहिली चूक कूपर कॉनॉलीकडून झाली. आठव्या षटकात ईशान किशन केवळ ९ धावांवर असताना, लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर डीप स्क्वेअर लेगवर त्याचा अगदी सोपा झेल कॉनॉलीने सोडला. यानंतरच्या षटकात शशांक सिंगकडूनही मोठी चूक झाली. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर त्याने सोपा झेल सोडला. मागील तीन सामन्यांत त्याचा हा पाचवा सुटलेला झेल ठरला, ज्यामुळे त्याच्या क्षेत्ररक्षणातील खराब फॉर्म स्पष्ट झाला.

थोड्याच वेळात, रिकी पॉन्टिंग यांच्या मुलाखतीदरम्यान लॉकी फर्ग्युसनने पुन्हा एकदा ईशान किशनला जीवदान दिलं. यावेळी तो १८ धावांवर होता, आणि त्यामुळे संघाची अवस्था आणखी बिकट झाली. युजवेंद्र चहल हे पाहून निराश होऊन मैदानावर बसला. ही सगळी चुकांची मालिका स्ट्रॅटेजिक टाइमआउटनंतर लगेचच घडली होती. त्या वेळी पॉन्टिंग स्वतः मैदानात उतरून खेळाडूंचा उत्साह वाढवत होते. त्यानंतरच्या षटकात ईशान किशनला आणखी एक संधी मिळाली, जेव्हा यष्टिरक्षक प्रभसिमरन सिंगकडून स्टंपिंगची सोपी संधी सुटली.

“खरं सांगायचं तर, हे आमच्यासाठी एखाद्या ‘व्हायरस’सारखं झालं आहे. या हंगामात आम्ही खूप झेल सोडले आहेत. मुलं खूप मेहनत घेत आहेत, पण बिचाऱ्या शशांकच्या बाबतीत असं वाटतंय की चेंडू त्याला शोधून त्याच्या मागेच लागला आहे. तो जणू प्रत्येक वेळी चेंडूखालीच उभा असतो,” पॉन्टिंग म्हणाले.

“त्याच्या डाव्या हॅमस्ट्रिंगमुळे तो काही सामने खेळू शकला नव्हता, त्यामुळे परत यायला त्याला दीड आठवडा लागला. गेल्या आठवडाभरात त्याने फिटनेससाठी खूप मेहनत घेतली आहे आणि गेल्या पाच-सहा दिवसांत आम्ही झेल पकडण्याच्या सरावावर विशेष भर दिला आहे,” असंही त्यांनी सांगितलं.