सीमारेषेजवळ म्हणजेच बॉण्ड्रीजवळ भन्नाट झेल टिपणारे अनेकजण आपण यापूर्वी पाहिले असतील. अनेकदा असे झेल टिपताना दोन खेळाडू एकमेकांना सहकार्य करताना दिसतात. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर एका अभूतपूर्व क्षेत्ररक्षणाचं अतुलनीय प्रदर्शन व्हायरल होतं आहे. अर्थात ही उपरोधिक पद्धतीने केलेली कमेंट असून हा प्रकार घडला मार्श कपच्या स्पर्धेत.

झालं असं की, दोन खेळाडूंनी एकामेकांच्या मदतीने एक तुफान झेल घेतला. मात्र त्यानंतरही चेंडू सीमारेषेच्या आत रहावा यासाठी अन्य एका खेळाडूची मदत त्यांना घ्यावी लागली. पण या तिसऱ्या खेळाडूने असं काही केलं की हा व्हिडीओ सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

साऊथ ऑस्ट्रेलिया आणि क्विन्सलॅण्डदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये हा प्रकार घडला. क्विन्सलॅण्डच्या फलंदाजीदरम्यान ३७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज मायकल नेसरने जलदगती गोलंदाज ब्रॅण्डन डोगेटला एक फूल टॉस चेंडू टाकला. त्यावर नेसरने तो मिड-विकेटच्या दिशेला हवेत टोलवला. एका क्षणी वाटलं की हा चेंडू आता थेट सीमेपार जाईल. तो गेला खरा पण दोन ब्रेक घेऊन. साऊथ ऑस्ट्रेलिया संघातील तीन खेळाडूंनी एकत्र येऊन हा चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला. पहिल्या खेळाडूने चेंडू पकडला मात्र आपला तोल जात असून आपण सीमारेषा ओलांडू असं वाटल्याने त्याने तो चेंडू मैदानात फेकण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जागेवरच उंच उडाला. हा चेंडू सीमारेषेपलीकडे पडू नये म्हणून दुसऱ्या खेळाडूने हवेत उडी घेत जमीनीला स्पर्श न करता तो चेंडू मैदानात ढकलला. इथपर्यंत तर सारं काही ठीक झालं मात्र तिसऱ्या खेळाडूने असं काही केलं की ते पाहून सर्वच गोंधळात पडलेत.

तिसऱ्या खेळाडूने चेंडू पकडला खरा पण तो अगदी सीमारेषेपलीकडे जाऊ नये यासाठी धडपड न करता एकदमक कॅज्युअली चेंडू हातात घेऊन पाय सीमारेषेवर ठेवून मोकळा झाला. त्यामुळे आधीच्या दोन खेळाडूंनी केलेले प्रयत्न वाया गेले आणि तो शेवटी षटकारच ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून तिसरा खेळाडू असा निरुत्साही का होता असा प्रश्न अनेकजण विचारताना दिसत आहेत.