Vijay Hazare Trophy UP vs CHD: विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. यादरम्यान रिंकू सिंगची बॅट तळपली असून रिंकूने शानदार शतक झळकावलं आहे. उत्तरप्रदेश आणि चंदीगढ यांच्यातील सामन्यात कर्णधार रिंकू सिंगची बॅट तळपली, त्याच्या शतकाच्या मदतीने संघाने ५० षटकांत ३६७ धावांचा डोंगर उभारला आहे.
रिंकू सिंगने अवघ्या ५६ चेंडूत त्याचं शतक पूर्ण केलं. यासह शतकी खेळी करत रिंकू सिंग नाबाद परतला. रिंकूने ६० चेंडूत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १०६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी रिंकू सिंगची भारतीय संघात निवड झाली आहे. दरम्यान शतकी खेळीसह त्याने निवडकर्त्यांचा निर्णय अगदी योग्य असल्याचा पुन्हा एकदा सिद्ध केलं.
रिंकू सिंगने विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद १०६ धावांची खेळी करत आपला फॉर्म कायम ठेवला. रिंकू सिंहची लिस्ट ए क्रिकेट व फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५० अधिक सरासरी आहे. तर टी-२० सामन्यांमध्ये त्याची सरासरी ३३ असून त्याचा स्ट्राईक रेट १४७ अधिक आहे. रिंकू सिंग एक उत्तम फिनिशर असल्याचं त्याने पुन्हा एकदा आकड्यांमधून सिद्ध केलं आहे.
चंदीगढ संघाने नाणेफेक जिंकत रिंकू सिंहच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यासह संघाची सुरूवात खराब झाली. पण दुसरा सलामीवीर आर्यन जुयाल याने १३४ धावांची वादळी खेळी केली. आर्यन जुयालने ११८ चेंडूत ७ चौकार व ८ षटकारांसह १३४ धावा केल्या. तर ध्रुव जुरेलने ५७ चेंडूत ११ चौकारांसह ६७ धावा केल्या, तर समीर रिझवीने ३२ धावांचं योगदान दिलं. यानंतर कर्णधार रिंकू सिंगने ६० चेंडूत १०६ धावांची नाबाद खेळी करत चंदीगढ संघाला विजयासाठी ३६८ धावांचं मोठं योगदान दिलं आहे.
