Rinku Singh Record for KKR IPL 2026: केकेआरचा संघ यंदाच्या स्पर्धेतील दुसरा सामना खेळतआ आहे. पहिल्याच सामन्यात केकेआरला मुंबई इंडियन्सविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता संघ दुसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळत आहे. सनरायझर्स हैदराबाने प्रथम फलंदाजी करत केकेआरला विजयासाठी २२७ धावांचं मोठं लक्ष्य दिलं आहे. घरच्या मैदानावर केकेआरच्या विजय मिळवण्यावर नजरा आहेत. यादरम्यान संघाचा उपकर्णधार रिंकू सिंहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रिंकू सिंहने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक मोठा विक्रम रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अनिकेत वर्माचा झेल घेतल्यानंतर त्याने ही कामगिरी केली, जो केकेआरसाठी त्याचा ४१वा झेल होता.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आता रिंकू सिंहच्या नावावर आहे. गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने आधी इशान किशनचा झेल घेतला आणि नंतर अनिकेत वर्माला झेलबाद करण्यात मदत केली. त्याने आता कोलकातासाठी ४१ झेल घेत आंद्रे रसेलचा ४० झेलचा विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये केकेआरसाठी सर्वाधिक ४१ झेल घेण्याचा विक्रम आता रिंकू सिंहच्या नावावर आहे. आंद्रे रसेल ४० झेलसह दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील नरेननेही कोलकाता नाईट रायडर्ससाठी ३६ झेल घेतले आहेत, तर मनोज तिवारीने तीन वेळच्या आयपीएल विजेत्या संघासाठी ३० झेल घेतले आहेत.
IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
४१ झेल – रिंकू सिंग
४० झेल – आंद्रे रसेल
३६ झेल – सुनील नरेन
३० झेल – मनोज तिवारी
रिंकू सिंग आतापर्यंत फक्त कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळला आहे. त्याने या संघासाठी ६० सामन्यांमध्ये १४५.५० च्या एकूण स्ट्राइक रेटने १,१३२ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामापूर्वी रिंकू सिंहवर संघाचा उपकर्णधार म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्त्व करत आहे.
आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर आहे, ज्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना १०३ झेल घेतले आहेत. त्याने २०१० ते २०२२ दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळताना ही कामगिरी केली.
