Rinku Singh Emotional Post for Late Father: संपूर्ण देश टी-२० विश्वचषकातील भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. तर रिंकू सिंहसाठी विश्वचषक जिंकल्याचा आनंद असतानाही दु:खाचा मोठा डोंगरदेखील आहे. टी-२० विश्वचषक सुरू असताना रिंकू सिंहच्या वडिलांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं. आता टी-२० विश्वचषक विजयानंतर रिंकू सिंहने आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
वडिलांच्या निधनानंतर पुन्हा टी-२० विश्वचषकासाठी रिंकू सिंह सामील झाला होता. यादरम्यान त्याने वडिलांच्या निधनाबाबत कोणतीच पोस्ट केली नव्हती. पण विजयानंतर आता रिंकूने पहिल्यांदाच सोशल मीडियावर आपल्या वडिलांबद्दलच्या भावना शेअर केल्या आहेत. यादरम्यान रिंकूने वडिलांबरोबरचा नव्या कारबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. रिंकू सिंह वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच पुन्हा टी-२० विश्वचषक संघात परतला होता. टी-२० विश्वचषक देशासाठी रिंकूने जिंकून द्यावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण वडिलांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा आनंद साजरा करण्यासाठी वडील सोबत नसल्याचं दु:ख रिंकूने या पोस्टमध्ये बोलून दाखवलं आहे.
रिंकूने वडिलांसाठी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “मी कधीच इतका वेळ तुमच्याशी न बोलता राहिलेलो नाही. तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं असेल मला माहित नाही… पण मला प्रत्येक पावलावर तुमची गरज भासेल.”
रिंकू सिंहने पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “तुम्ही मला शिकवलंत की कर्तव्य सर्वात आधी येतं, म्हणून मी मैदानावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. आता तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे, पण तुमची आज कमी भासतेय, तुम्ही असतात तर बरं झालं असतं. आनंदाच्या प्रत्येक लहान-मोठ्या क्षणी मला तुमची खूप आठवण येईल. बाबा….”
रिंकू सिंहने वडिलांसाठी शेअर केलेल्या पोस्टने सर्वांनाच भावुक केलं आहे. रिंकूच्या या पोस्टवर अनेक क्रिकेटपटू व चाहत्यांना कमेंट करत त्याला धीर दिला आहे. टी-२० विश्वचषकात रिंकू सिंहने भारतासाठी फक्त पाच सामने खेळले. नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या डावात त्याने चौकारांची फटकेबाजी करत आणि धावसंख्येत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनला संघात स्थान दिल्याने रिंकूला प्लेईंग इलेव्हनबाहेर बसावं लागलं.
प्लेईंग इलेव्हनमध्ये नसला तरी रिंकूने प्रत्येक सामन्यात आपल्या क्षेत्ररक्षणाने आणि चपळाईने संघाला पाठिंबा दिला. वडिलांच्या निधनानंतरही, तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पुन्हा संघात सामील झाला. त्याचे वडील व्हेंटिलेटरवर असल्याचे कळल्यानंतर तो यापूर्वी घरी गेला होता, परंतु झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो पुन्हा टीम इंडियामध्ये सामील झाला.
