Rinku Singh Father Dies : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग याचे वडील, खानचंद सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. स्टेज ४ यकृताच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर निधन झाले. माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. खानचंद सिंग यांच्यावर ग्रेटर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
या आठवड्याच्या सुरुवातीला रिंकूच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते. वडिलांच्या आजारपणामुळे २८ वर्षीय रिंकू सिंगने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० वर्ल्डकप २०२६ सुपर ८ सामन्यापूर्वी घरी गेला होता. रिंकू सामना सुरू होण्यापूर्वी संघात परतला , मात्र त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्याच्या ऐवजी संघात संजू सॅमसनला स्थान देण्यात आले होते.
दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करताना हरभजन सिंगने असेही म्हटले की, टी२० विश्वचषकादरम्यान रिंकू त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत असला तरी त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण असल्याची आपल्याला जाणीव असल्याचे म्हटले आहे.
“रिंकू सिंगचे वडील श्री खानचंद सिंगजी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. तो टी२० विश्वचषकादरम्यान त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत असला तरी हा काळ नक्कीच रिंकू आणि त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण असणार आहे,” असे हरभजनने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्याच्या (रिंकू) आणि त्याच्या प्रियजनांबरोबर आहेत. वाहेगुरु निघून गेलेला आत्म्यास चिरशांती देवो आणि शोकाकूल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि धैर्य देवो,” असेही त्याने पुढे म्हटले आहे.
रिंकू सिंग यांच्या क्रिकेट करिअरच्या जडणघडणीत त्याच्या वडिलांचे मोलाचे योगदान राहिले आहे. रिंकूचे वडील हे अलीगड येथे एलपीजी सिलेंडर वितरणाचे काम करत. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी रिंकूच्या क्रिकेट करिअरसाठी सर्व सुविधा मिळवून दिल्या. गेल्या वर्षी, रिंकु सिंगने आपल्या वडिलांना ३.१९ लाख रुपये किमतीची Kawasaki Ninja ही बाईक भेट दिली होती.
