Rinku Singh Fiance Priya Saroj Video: लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात यंदाच्या स्पर्धेतील सुपपर ओव्हर पाहायला मिळाली. केकेआरने या सुपर ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर सामना जिंकला. सुनील नरेनच्या भेदक गोलंदाजीनंतर रिंकूच्या कमालीच्या फटकेबाजीने केकेआरने हा महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. त्याच्या या कामगिरीनंतर त्याची होणारी पत्नी प्रिया सरोज भावुक झाली आणि रिंकूने जी कामगिरी केली आहे, ती त्याच्या वडिलांसाठी असल्याचं तिने सांगितलं.

टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेदरम्यान रिंकू सिंहने आपल्या वडिलांना गमावलं. वडिलांच्या निधनाच्या दुःखातून रिंकू अजूनही सावरलेला नाही. आपल्या वडिलांची आठवण ठेवून, त्याने २६ एप्रिल रोजी आयपीएल २०२६ मध्ये सामना जिंकून देणारी कामगिरी केली. असं त्याची भावी पत्नी आणि खासदार प्रिया सरोज हिने म्हटलं.

केकेआरच्या विजयानंतर, एकाना स्टेडियममधूनच प्रिया सरोज हिचं एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यानुसार रिंकू सिंह हा सामना केवळ त्याच्या वडिलांसाठी खेळला. केकेआर विरुद्ध एलएसजी सामन्यातील रिंकू सिंगच्या कामगिरीबद्दल बोलताना प्रिया सरोज म्हणाल्या की, “तो आजची ही खेळी त्याच्या वडिलांसाठी खेळला. आम्हा सर्वांना त्यांची खूप आठवण येते. ही कामगिरी त्याच्या वडिलांसाठी होती.” प्रिया सरोज यांचा हा व्हिडिओ स्टेडियममधील आहे, जिथे त्या केकेआरचा झेंडा हातात घेऊन केकेआरचा संघ व स्टार अष्टपैलू खेळाडू रिंकू सिंह यांना सपोर्ट करताना दिसली. लखनौमध्ये सामना असल्याने प्रिया सरोज हा सामना पाहण्यासाठी पोहोचली होती आणि तिच्या उपस्थितीत रिंकूने कमालीी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.

लखनौविरुद्धच्या सामन्यातील रिंकू सिंहच्या प्रभावी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवता आला. रिंकू सिंहने ५१ चेंडूंमध्ये पाच षटकार आणि सात चौकारांसह नाबाद ८३ धावा केल्या. त्याने पाच झेलही घेतले. जेव्हा सामना बरोबरीत सुटून सुपर ओव्हरमध्ये गेला, तेव्हा रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या कॅचने सामना पालटला. त्याने एक झेल घेतला आणि विजयी चौकारही लगावला. त्याच्या या प्रभावी कामगिरीबद्दल रिंकू सिंहला सामनावीर म्हणून गौरविण्यात आलं.

रिंकू सिंहने या सामन्यातील अखेरच्या षटकात ४ दणदणीत षटकार लगावले होते. यामुळे केकेआरचा संघ १५५ धावांपर्यंत मजल मारू शकला. रिंकूच्या खेळीमुळे सामना अखेरच्या चेंडूपर्यंत जाऊ शकला.