कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिनिशिर रिंकू सिंगवर जोरदार टीका केली जात होती. गेल्या काही सामन्यांमध्ये तो नावाला साजेशी कामगिरी करू शकला नव्हता. पण राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रिंकू सिंग हा कोलकाता नाईट रायडर्ससाठी मॅचविनर ठरला आहे. कोलकाताचा संघ १५६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान कोलकाताला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण शेवटी रिंकू सिंगने कोलकाताला विजय मिळवून दिला. यादरम्यान झालेल्या २ चुका राजस्थान रॉयल्सला चांगल्याच महागात पडल्या.
कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना जिंकण्यासाठी १५६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा कोलकाताची फ्लॉप सुरुवात झाली. टीम सेफर्ट आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला अंगकृष रघुवंशी अवघ्या १० धावा करून माघारी परतला. कॅमेरुन ग्रीनने हातभार लावत २७ धावा केल्या. तर रोमन पॉवेलने २३ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंग आणि अनुकूल रॉयने मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. रिंकू सिंगने नाबाद ५३ तर अनुकूल रॉयने नाबाद २९ धावांची खेळी करून कोलकाताला पहिला विजय मिळवून दिला.
या २ चुका राजस्थान रॉयल्सला महागात पडल्या..
रिंकू सिंग या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयाचा हिरो ठरला. तो शेवटपर्यंत उभा राहिला आणि कोलकाताला विजयाचं खातं उघडून दिलं. पण रिंकू सिंग ज्यावेळी अवघ्या ८ धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी जडेजाच्या गोलंदाजीवर नांद्रे बर्गरने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर ४ प्रमुख गोलंदाजांचे षटक शिल्लक असताना रियान पराग स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आला. १५ व्या षटकात रिंकू सिंगने रियान परागच्या षटकात १० धावा वसूल केल्या.
राजस्थान रॉयल्सने केल्या १५५ धावा
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८१ धावा जोडल्या. यशस्वी जैस्वालने ३९ तर वैभव सूर्यवंशीने ४६ धावांची खेळी केली. ध्रुव जुरेल ५ धावा करून माघारी परतला. तर कर्णधार रियान पराग अवघ्या १२ धावा करू शकला. शेवटी शिमरोन हेटमायरने १५ धावा केल्या. तर डोनोवन फरेराने ७, रवींद्र जडेजाने ९ आणि जोफ्रा आर्चरने ८ धावांची खेळी केली. चांगली सुरुवात मिळूनही राजस्थानला २० षटकांअखेर ९ गडी बाद १५५ धावा करता आल्या.
