Rinku Singh And Priya Saroj Marriage Date: भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह आणि समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघांचा शाही विवाह सोहळा ४ डिसेंबरला लखनौतील रमाडा हॉटेलमध्ये पार पडणार आहे. ८ जून २०२५ ला लखनौतील सेंट्रम हॉटेलमध्ये दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. आता दोघांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. दोघांच्याही कुटुंबात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. दोघांच्या शाही विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज खेळाडू आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावू शकतात.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाह जून २०२६ मध्येच होणार होता. पण रिंकूचे वडील खानचंद सिंह यांचे निधन झाल्याने हा विवाह पुढे ढकलण्यात आला होता. रिंकूच्या यशात त्याच्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे. खानचंद सिंह यांना रिंकूचा विवाह सोहळा पाहायचा होता. पण विवाह होण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन विवाहाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता हा विवाह सोहळा ४ डिसेंबरला ठरवण्यात आला आहे.
जून २०२५ मध्ये झालेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावी होती. यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. हा कार्यक्रम लखनौतील सुशांत गोल्फ सिटी येथे असलेल्या द सेंट्रम हॉटेलमध्ये पार पडला होता.
कोण आहेत प्रिया सरोज?
भारताच्या टी-२० संघातील फिनिशर म्हणून ओळखल्या जाणारा रिंकू सिंग अलीगडमध्ये राहतो. रिंकू सिंग हा टी-२० संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहे. तर प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. कमी वयात त्यांनी राजकारणात आपली चांगलीच ओळख निर्माण केली आहे. २०२४ मध्ये झालेल्या निवडणूकीत यूपीतील मछलीशहर लोकसभेतून निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आल्या. ४ डिसेंबरला होणाऱ्या विवाह सोहळ्यात क्रिकेट आणि राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे.
