Rinku Singh Father Video: रिंकू सिंहचे वडील खानचंद सिंह यांचं दीर्घकालीन आजारानंतर निधन झालं. रिंकू सिंह झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यापूर्वी व्हेंटिलेटरवर असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी गेला होता. ही रिंकू व त्याच्या वडिलांची अखेरची भेट ठरली. रिंकूचे वडील स्टेज-४ लिव्हर कॅन्सरने त्रस्त होते. २७ फेब्रुवारीला सकाळी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिंकूने वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

रिंकूने वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत त्यांना अखेरचा निरोप दिला, ज्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी सकाळी वडिलांच्या निधनानंतर, रिंकू दुपारपर्यंत अलीगढला पोहोचला आणि त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. वडिलांच्या पार्थिवाला खांदा देताना रिंकू अत्यंत व्यथित आणि भावनाविवश दिसत होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रिंकू निळ्या रंगाची कॅप घालून कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये वडिलांचे पार्थिव घेऊन अंत्यसंस्कारासाठी जाताना दिसत आहे.

ही हृदयद्रावक घटना घडली तेव्हा रिंकू सिंह भारतीय संघासोबत टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यापूर्वी वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने तो आधी घरी परतला होता. मात्र नंतर तो पुन्हा चेन्नईत संघात दाखल झाला. झिम्बाब्वेविरुद्धच्या करो या मरो लढतीसाठी भारतीय संघात बदल झाल्यामुळे रिंकूला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. संघाचा समतोल साधण्यासाठी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली. सॅमसनला पुन्हा सलामीला बढती देण्यात आली, तर इशान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. तसेच तिलक वर्मावर फिनिशरची जबाबदारी सोपवण्यात आली.

रिंकू उर्वरित स्पर्धेत खेळणार का?

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नसली तरी रिंकू संघासोबतच होता आणि बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता. आतापर्यंतच्या स्पर्धेत त्याने पाच सामने खेळून २४ धावा केल्या असून फिनिशर म्हणून आपली भूमिका बजावली आहे.

आता भारताचा पुढील करो या मरो सामना वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यात होणार असल्याने रिंकूच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. रिंकू आता टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापनाकडून त्याच्या सहभागाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, क्रिकेटविश्वातून रिंकू आणि त्याच्या कुटुंबीयांप्रती शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. माजी कर्णधार विराट कोहली, तसेच शिखर धवन आणि इरफान पठाण यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला.