Rinku Singh viral video sparks debate before UP T20 League: भारतीय संघाचा स्टार फिनिशर रिंकू सिंह आजपासून सुरु होणाऱ्या यूपी टी-२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत तो मेरट मॅवेरिक्स संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच रिंकू सिंह वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो व्हायरल होताच, रिंकू सिंहवर जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.

रिंकू सिंहचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर रिंकू सिंहचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडीओ रिंकू सिंहच्या अलीगढमधील घरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिंकू सिंह कोणासोबत तरी फोनवर बोलतोय. फोनवर बोलत असताना तो मंदिराजवळ ठेवलेली किट बॅग उचलतो आणि बाहेर जातो. पण मंदिराजवळ असलेली किटबॅग उचलताना त्याच्या पायात चप्पल आहे. यावरुन त्याला ट्रोल केलं जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा @cricket_live247 या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर, “रिंकू सिंहला पाहा, घरातील मंदिराजवळ असलेली किटबॅग चप्पल घालून उचलतोय.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युझरने लिहिले की, “हे तर चुकीचं आहे.” तर आणखी एका युझरने लिहिले की, “जेव्हा अचानक पैसा येतो, तेव्हा वागणूक तर बदलतेच.” एकीकडे त्याला ट्रोल केलं जात आहे. तर काही युझर्स त्याचं समर्थन करताना दिसून आले आहेत. एका युझरने लिहिले की, “तो फोनवर बोलतोय, तो पुजा करण्यासाठी गेलेला नाही आणि हे त्याच्या घरातील मंदीर आहे.”, तर आणखी एका युझरने लिहिले की, “हे त्याचं घर आहे, त्याला जसं राहायचंय राहू द्या.”

रिंकू सिंह यूपी टी-२० लीग स्पर्धेत खेळणार

रिंकू सिंहला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. आता तो यूपी टी-२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. तो मेरठ मॅवेरिक्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.मेरठ मॅवेरिक्स संघाचा सामना काशी रुद्रास संघाविरुद्ध होणार आहे.