तिच्या घरात बास्केटबॉलची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे खेळांचे बाळकडू आनुवंशिकपणे दाखल झालेलं, मात्र तरीही आपण स्वत: खेळावं असं तिला वाटलं नव्हतं. खेळ टीव्हीवर अथवा प्रत्यक्ष पाहायला तिला प्रचंड आवडायचं. खेळाडू होण्याच्या प्रक्रियेपेक्षा खेळाडू घडण्याची खेळाडूमधला माणूस उलगडावा असं तिला वाटे. क्रीडा पत्रकारितेचं क्षेत्र तिला खुणावत होतं. त्या दृष्टीने काय करता येईल, यासाठी तिच्या डोक्यात विचारचक्रे सुरू झाली होती. २००८मधील त्या क्षणाने तिचा दृष्टिकोनच बदलला.

तो दिवस तिला आजही लख्ख आठवतो. ११ ऑगस्ट, २००८. जयपूरच्या घरी पावसाळी संध्याकाळी ती ऑलिम्पिक स्पर्धा टीव्हीवर पाहत होती. काही क्षणांतच नेमबाज अभिनव बिंद्राचे सामने सुरू झाले. पात्रता, मुख्य फेरी असे टप्पे होत मुकाबला अंतिम टप्प्यात आला. चुरशीच्या लढतीत अभिनवने बाजी मारली. क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च स्पर्धेत भारताला मिळालेलं ते पहिलंवहिलं वैयक्तिक सुवर्णपदक. संपूर्ण भारतात जल्लोष साजरा झाला. क्रिकेटेतर खेळांमध्येही आपण तिरंगा अभिमानाने फडकावू शकतो, हा विश्वास अभिनवने दिला. ऑलिम्पिकची ज्योत प्रत्येक स्पर्धेनंतर संक्रमित होते. त्याच धर्तीवर अभिनवच्या पदकाने खेळण्याची प्रेरणा अपूर्वीच्या मनात संक्रमित झाली. काही मिनिटांतच पदक वितरणाला सुरुवात झाली. निवेदकानं शेवटचं नाव पुकारलं.. सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, भारत. प्रमुख पाहुण्यांनी ते लखलखतं सुवर्णपदक अभिनवच्या गळ्यात घातलं. पुढच्याच मिनिटांला अव्वल तिघांच्या देशांचे ध्वज दिसू लागले. सुवर्णपदक विजेता भारताचा असल्याने ‘जन गण मन..’ सुरू झालं. बीजिंगपासून हजारो किलोमीटर दूर भारतातल्या चाहत्यांच्या अंगावर रोमांच उभा करणाऱ्या त्या क्षणाने स्फुलिंग चेतवलं. खेळाडूतला माणूस टिपण्याऐवजी आपण थेट खेळाडूच व्हावं, असं अपूर्वीला कुठे तरी खोल मनात जाणवलं. नेमबाजच व्हावं असा तिने निग्रह केला.

वय लहान होतं, जेमतेम दहावी पूर्ण होत होती. अपूर्वीचा विचार ऐकून घरचेही चकित झाले. खेळ हा अव्हेरण्याचा विषय निदान तिच्या घरी नव्हता. परंतु बंदूक, पिस्तूल, त्या संदर्भातील सामुग्री, जॅकेट्स ही परिभाषा सगळ्यांनाच नवीन होती. लाडक्या लेकीचा हट्ट पुरवायला हवा म्हणून तिचे बाबा जयपूरच्या नेमबाजी केंद्रात घेऊन गेले. बाकी खेळांच्या तुलनेत केंद्रातलं रुक्ष, गंभीर वातावरण तिला फारसं रुचलं नाही. सुरुवातीला तिने पिस्तूल नेमबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण तेही तिला फारसं भावलं नाही. मग तिने सगळा जामानिमा परिधान करत रायफल नेमबाजीचा प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नात अचूक लक्ष्यवेध झाला. हे आपल्याला जमू शकतं असा विश्वास अपूर्वीला वाटला आणि तेव्हापासून तिच्या आयुष्यातलं नेमबाजी पर्व सुरू झालं.

अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक सुवर्णपदकासह पाहतानाच्या क्षणापासून आठ वर्षांत अपूर्वी त्याच्या बरोबरीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. आदर्श आणि प्रेरणादायी क्षण देणाऱ्या माणसासह सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं अपूर्वीचं स्वप्न साकार होणार आहे. महाराष्ट्राची लाडकी लेक असलेल्या अंजली भागवत यांनी रायफल नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर मापदंड प्रस्थापित केला. मात्र त्यांनी स्पर्धात्मक निवृत्ती घेतल्यानंतर या प्रकारात भारताचे वर्चस्व कमी होत गेले. मात्र यंदा अपूर्वी आणि अयोनिका पॉल या दोघींच्या रूपात रायफल नेमबाजीमध्ये भारताचे पुनरुज्जीवन होणार आहे. आठ वर्षांचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.

अपूर्वीच्या काकांनी त्यांच्या घरीच नेमबाजीचे केंद्र उभारले. या भक्कम पाठिंब्यामुळे अपूर्वीच्या सरावाच्या ठिकाणाची चिंता मिटली. अपूर्वीचे बाबा तिच्या प्रत्येक स्पर्धेतील कामगिरीची नोंद ठेवतात. तिची आई प्रत्येक स्पर्धेत बरोबर असते. नेमबाजीवर लक्ष केंद्रित करणं तिचं काम, बाकी गोष्टींचा भार घरचे वाहतात. २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. वरिष्ठ गटात संक्रमित झाल्यानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत अपूर्वीने हे यश मिळवलं. २०१४ मध्ये हाग येथे झालेल्या इंटरशूट अजिंक्यपद स्पर्धेत अपूर्वीने चार पदकांवर नाव कोरले. त्याच वर्षी ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमासह अपूर्वीने सुवर्णपदकावर कब्जा केला. या प्रदर्शनाने अपूर्वी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. दुखापतीमुळे असह्य़ वेदना होत असतानाही मिळवलेल्या या पदकाने तिची मानसिक आणि शारीरिकता कणखरता सिद्ध झाली. गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील चांगवोन येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात कांस्यपदकासह अपूर्वीने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. काही दिवसांतच म्युनिक येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अपूर्वीने रौप्यपदक पटकावले. नव्या पिढीची प्रतिनिधी अपूर्वी तंत्रकुशल आहे.जिंकल्यानंतर हुरळून जात नाही आणि पराभूत झाल्यावर खचून जात नाही. रिओमध्ये ही मानसिकता उपयोगी पडू शकते. नेमबाजीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराजा कर्णीसिंग यांच्यापासून राज्यवर्धन सिंग राठोड राजस्थानची भूमी लढवय्यांची म्हणून ओळखली जाते. शूर योद्धय़ांचा वसा जपणाऱ्या राजस्थानमध्ये भारताच्या यशाची अपूर्वाई साजरी होणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

अपूर्वीची कामगिरी

  • अजिंक्यपद स्पर्धा- सुवर्णपदक
  • २०१४-ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा- सुवर्णपदक
  • २०१५-नेमबाजी विश्वचषक- कांस्यपदक
  • २०१५-नेमबाजी विश्वचषक अंतिम फेरी-रौप्यपदक

 

पराग फाटक
parag.phatak@expressindia.com