खेळात प्रतिस्पर्ध्यांमध्ये लोभ नसला तरी सौजन्य असावे हे शिष्टसंमत आहे. एकाच देशाचे खेळाडू असतील तर एकाच्या विजयाने दुसऱ्याला आनंद होणे ही ‘देशगौरव’ या भावनेला दिलेली मोठी सुमनांजली ठरते.
पी. व्ही. सिंधूने उपांत्य सामना जिंकल्यावर सर्व देशात तिचे कौतुक झाले. सर्व देशवासीयांचे ऊर अभिमानाने भरून आले. ट्विटर, फेसबुक, टीव्ही, वर्तमानपत्र सगळीकडे अभिनंदन संदेशांचा पाऊस पडला. काही ख्यातनाम व्यक्तीनी दक्षिण मुंबईमधल्या निरुद्योगी पेज थ्री छाप शिळोप्याकार कम पत्रकारांना उद्देशून शालजोडीतले मारून त्यांना उगाच पेज वनवर आणून त्यांचा मूळ हेतू साध्य करून दिला.
या सगळ्या जल्लोषात लक्ष वेधून घेत होते ते सायना नेहवालचे कानठळ्या बसवणारे मौन. भारतातील बॅडमिंटनची सम्राज्ञी म्हणून ऑलिम्पिक कास्य पदक विजेत्या सायनाचे स्थान अढळ होत चालले आहे, असे वाटत असतानाच सिंधूचा उदय झाला. जागतिक चषक स्पर्धेत दोनदा कास्य पदक मिळवून सिंधूने आपला बोलबाला केला. प्रिमियर बॅडमिंटन लीगमध्येसुद्धा सिंधूला सायनाच्या आसपासची बोली मिळू लागली. त्यातच सायनाने प्रशिक्षक गोपीचंदला रामराम ठोकला. हे करत असताना तिने गोपीचंदच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सायनाचे गोपीचंदला सोडून बंगलोरला जाणे यात सिंधूचा गोपीचंदच्या देखरेखेखाली होणारा उदय हे सुद्धा एक कारण होते. व्यावसायिक खेळात व्यवसाय महत्वाचा असतो हे खरेच. प्रायोजक, कंत्राटे, जाहिराती, लिलाव बोल्या आधी येतात नंतर ध्वज, राष्ट्रप्रेम वगैरे येते असे जगभर म्हणले जाते.
सायनाच्या राष्ट्रप्रेमावर शंका उपस्थित करण्याचा मूर्खपणा कोणी करू नये, हे खरे असले तरी सिंधूच्या जयघोषात एक स्वर सायनाचा का नसावा ही अपेक्षा वाजवीपेक्षा जास्त नक्कीच नाही. आजच्या अंतिम सामन्यासाठी सिंधूला खूप शुभेच्छा. १९ ऑगस्ट भारतीय क्रीडा इतिहासातील सुवर्णदिन ठरो!!!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com