गॅब्रियल, नेयमारचे दोन गोल; जर्मनीशी सामना

गॅब्रियल जिजस व नेयमारच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर यजमान ब्राझीलने फुटबॉल स्पध्रेत होंडुरासचा ६-० असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदासाठी त्यांच्यासमोर जर्मनीचे आव्हान असणार आहे. २०१४च्या विश्वचषक स्पध्रेत जर्मनीकडून पत्करावा लागलेल्या ७-१ अशा लाजिरवाण्या पराभवाची परतफेड करण्याची संधी ब्राझीलला मिळाली आहे. मर्किन्होस व लुआय यांनी प्रत्येकी एक गोल करून ब्राझीलच्या विजयात हातभार लावला.

उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत जर्मनीने नायजेरियावर २-० असा विजय मिळवला. नवव्या मिनिटाला सर्जी गॅनब्रीने नायजेरियाच्या गोलरक्षकाला चकवून गोल केला. बदली खेळाडू म्हणून आलेल्या नील्स पीटरसनने जर्मनीतर्फे दुसरा गोल केला.

 

रशिया, कझाकस्तान, बेलारुसवर बंदी?

उत्तेजक प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाचा पवित्रा

रिओ दी जानिरो : उत्तेजक प्रकरणामुळे रशिया, कझाकस्तान आणि बेलारुस यांच्यावर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडून एका वर्षांची बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर ही बंदी लागू होईल, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष टॅमस अजॅन यांनी एका मुलाखतीतून दिली. ‘‘सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला बंदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेनंतर या देशांवर बंदी घालण्यात येईल. यामध्ये रशिया, कझाकस्तान आणि बेलारूस या देशांचा समावेश असेल, याची मी खात्री देतो,’’ असेही अ‍ॅजन यांनी सांगितले.

ऑलिम्पिक स्पध्रेत कझाकस्तानने आत्तापर्यंत पाच पदके, तर बेलारुसने दोन रौप्यपदके जिंकली आहेत. या पदक विजेत्या खेळाडूंनी बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये उत्तेजकाचे सेवन केले नसल्याचे समोर आले आहे.