ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा नेहमीच चर्चेचा विषय असतो. संगीत, नृत्य, विविध देशांचे संचलन यांच्याबरोबरच संयोजक देशांतर्फे ऑलिम्पिकचे सूत्र मांडले जाते. सांबा नृत्य, कार्निव्हल अशी धमाल मस्तीची संस्कृती असलेल्या ब्राझीलने पर्यावरणस्नेही ऑलिम्पिकची साद घातली. हवामान आणि जागतिक तापमान बदल या जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला. हलक्याफुलक्या वातावरणात परिसंवादीय विषयांची चर्चा झाली. याचं कारण ब्राझीलला अतिशय समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. हा पर्यावरणीय ठेवा जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचं संयोजकांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या तत्त्वांनुसार हरित ऑलिम्पिक होण्यासाठी ब्राझीलनं आयोजनाचे अधिकार मिळवताना नऊ कलमी सनदच सादर केली होती. ब्राझीलला आयोजनाचा अधिकार मिळण्यात या नऊ कलमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अधिकार मिळाल्यापासून वर्षभरातच ब्राझीलमध्ये विकासाचा बुडबुडा फुटला आणि देशाला आर्थिक मंदीनं ग्रासलं. सरकारी, निमसरकारी आणि खासगी पातळ्यांवरील आर्थिक डोलाराच कोसळल्यानं ऑलिम्पिक आयोजनातील प्रत्येक गोष्ट अवघड झाली. मूलभूत गोष्टीच अवघड झाल्याने पर्यावरणाचा मुद्दा दुय्यम स्थानी फेकला गेला. स्टेडियमची उभारणी, वाहतूक व्यवस्था, ऑलिम्पिकनगरीतील सोयीसुविधा अशा पसाऱ्यात पर्यावरण संवर्धन वगैरे गोष्टी कवडीमोल झाल्या.

ऑलिम्पिकदरम्यान सिंक्रोनाइज्ड स्विमिंग आणि वॉटरपोलोच्या स्पर्धा होणार असलेल्या तरणतलावातील निळे पाणी एकदम हिरवंच झालं. त्यामुळे जगभरातून दाखल झालेले आणि स्वत:च्या प्रकृतीबाबत जागरूक आणि देशाला पदक मिळवून देण्यासाठी आतुर खेळाडू चिंतित झाले. पाण्याचा रंग हिरवा झाला तरी आरोग्याला धोका नाही, हे संयोजकांनी स्पष्ट केलं. मात्र या उत्तरानं स्पर्धकांचं समाधान झालं नाही. उद्घाटनाच्या दिवशी तरणतलावात हायड्रोजन पेरॉक्साइड टाकण्यात आलं. पेरॉक्साइड आणि पाण्यातील क्लोरिन यांची प्रक्रिया झाल्यामुळे रंग बदलला. स्पर्धकांचं मन राखण्यासाठी संयोजकांनी दहा लाख गॅलन पाणी बाहेर सोडलं. ११ तास खर्चून हे काम करण्यात आलं. सुरुवातीला ८० लिटर हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात टाकण्यासाठी खर्च झाला. आता पाणी हिरवं झाल्यानं पाणी सोडलं म्हणून अपव्यय झाला. एकदम एवढं पाणी सोडण्यात आल्यानं अन्य समस्या निर्माण झाल्या आणि एवढं करूनही या तरणतलावातील शर्यती अन्य ठिकाणी स्थानांतरित करण्यात आल्या.

ऑलिम्पिकसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं निर्देश जारी केले आहेत. पाण्याशी संपर्क येणाऱ्या नौकानयन आणि तत्सम खेळातील खेळाडूंनी स्वत:ला चांगल्या दर्जाच्या कवचसदृश आवरणानं झाकावं. पाण्याची चव घेण्याचा जराही प्रयत्न करू नये. शर्यतीचा वेळ सोडून कमीत कमी वेळ पाण्यात थांबा. पाऊस झाल्यावर लगेचच पाण्यात जाणे टाळा. स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या आहेत. हे करूनही आजारी पडल्यास जबाबदारी तुमची, असंही यातून स्पष्ट होतंय.

स्पर्धा सुरू होईपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी आशा खेळाडूंना होती, पण घडलं भलतंच. रिओनजीकच्या गुआनबारा येथे नौकानयन (सेलिंग) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांना पाण्यात शिरल्यावर तीव्र दर्प जाणवला. रोगजन्य घातक रसायनं त्या पाण्यात असल्याचं स्पष्ट झालं. प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट सोडण्यात आल्यानं हे घडलं होतं. रिओ दी जानिरो शहर आणि आसपासची उपनगरं हा दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. असंख्य ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्थाच नाही. यामुळे घरांतून, कार्यालयातून निघणारं सांडपाणी थेट तलावात, नदीत किंवा समुद्रात सोडण्यात येतं. याहीपेक्षा भयंकर प्रकार म्हणजे औद्योगिक सांडपाण्यावरही देखील प्रक्रिया होत नाही. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक कंपन्या तसेच औषधनिर्मिती कंपन्यांचा कचरा थेट सोडण्यात येत असल्यानं धोका वाढला आहे. अशा प्रदूषित पाण्यात खेळल्यानं श्वसनाला त्रास जाणवल्याचं, पोटाचे विकार झाल्याचं अनेक खेळाडूंनी सांगितलं आहे. पाण्यामुळे होणारे आजार रिओवासीयांसाठी नवीन नाहीत.

तब्बल ११२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये गोल्फचा समावेश करण्यात आला आहे. सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्याचा गोल्फपटूंचा आनंद रिओत दाखल झाल्यावर थोडाच वेळ टिकला. केवळ या स्पर्धेसाठी बॅरा दा तिजुका परिसरात मारापेंडी नैसर्गिक परिसरात गोल्फचे मैदान उभारण्यात आले. मात्र सर्वोत्तम प्रदर्शनाऐवजी गोल्फपटूंना चिंता आहे, कधीही न पाहिलेल्या प्राण्यांची. गोल्फचे मैदान ज्या भागात बांधण्यात आलं आहे तो वन्यजीवांनी समृद्ध प्रदेश आहे. गोल्फच्या मैदानाने थेट त्यांच्या दैनंदिन वावरण्यात अडथळा निर्माण केला आहे. कॅपीबारा म्हणजे खास दक्षिण अमेरिकेत आढळणारं मोठय़ा आकाराचं अस्वल किंवा डुक्कर. यांच्या बरोबरीने दुर्मीळ असणारं कोरुजा घुबडांचे हे वस्तीस्थान आहे. यांच्याबरोबरीने साप, माकडं गोल्फकोर्सवर वावरत आहेत. आर्थिकदृष्टय़ा सधन वर्गालाच परवडणाऱ्या गोल्फसाठी दुर्मीळ वनसृष्टीचा बळी देण्याचं कुकर्म संयोजकांनी केलं. अशी उदाहरणं अनेक आहेत. पर्यावरणस्नेही आयोजन होण्यासाठी काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत हे प्रमाण तुटपुंजे आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्र स्पर्धा संपेपर्यंत कसे हरवू शकते, याचा प्रत्यय रिओने दिला.

आयोजनाचे हक्क मिळवताना ब्राझीलतर्फे मांडण्यात आलेल्या गोष्टी

  • पाण्यावर प्रक्रिया आणि संवर्धन
  • पर्यावरण जागरूकता
  • अक्षय ऊर्जा योजना
  • कार्बनमुक्त खेळ आणि वाहतूक
  • माती आणि पर्यावरण संवर्धन
  • शाश्वत बांधकाम प्रारूप
  • जैवविविधता आणि वनउभारणी
  • घनकचरा व्यवस्थापन

 

पराग फाटक

parag.phatak@expressindia.com