26 March 2019

News Flash

जैशानेच ऊर्जा पेये नाकारली!

प्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण

प्रशिक्षक निकोलाई यांच्या दाव्याने प्रकरणाला नवे वळण

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत मॅरेथॉन शर्यतीत पाणी व ऊर्जा पेय न दिल्याने मरणाच्या दारापर्यंत पोहोचल्याचा दावा करणाऱ्या ओ. पी. जैशा प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. शर्यतीदरम्यान जैशाने स्वत:हून ही पेये नाकारल्याचा दावा प्रशिक्षक निकोलाई स्नेसारेव्ह यांनी केला आहे. शर्यतीदरम्यान पेये लागणार नाही़, असे जैशाने स्पष्ट केल्यानंतरच आपण भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अधिकाऱ्यांना कळवल्याचे निकोलाई यांनी सांगितले.

ऑलिम्पिक स्पध्रेतील मॅरेथॉन शर्यतीदरम्यान अ‍ॅथलेटिक्स महासंघाने पाण्याची आणि ऊर्जा पेयाची सोय केली नव्हती. त्यामुळेच शर्यतीदरम्यान प्राण गमावण्याची वेळ आली होती, असा आरोप राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या जैशाने केला होता. एएफआयने जैशाचे हे आरोप फेटाळून लावले.

निकोलाई म्हणाले, ‘‘मॅरेथॉन स्पध्रेदरम्यान जैशा पाणी वापरत नाही आणि रिओत तिला पाण्याची गरज लागणार आहे का, असे विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला. स्पर्धेपूर्वी उपमुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी जैशाला स्पध्रेदरम्यान पाणी किंवा ऊर्जा पेयाची आवश्यकता आहे का, असे विचारले होते. तसेच मी स्वत: तिला आयोजकांकडून पुरवण्यात येणारे पेय चालेल का, असे विचारले होते. त्या वेळी तिने साधे पाणी पिणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मी नायर यांना ऊर्जा पेय किंवा पेयाची आवश्यकता नसल्याचे सांगितले.’’

प्रत्यक्ष शर्यतीदरम्यान पुरेसे पाणी उपलब्ध होते का? यावर निकोलाई यांनी नाराजीचा सूर धरला. ते म्हणाले, ‘‘मी मॅरेथॉनमध्ये धावत नव्हतो. त्यामुळे मी काही सांगू शकत नाही, परंतु मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या काही धावपटूंशी मी सवांद साधला. २५ ते ३० किलोमीटपर्यंत पाणी उपलब्ध होते, परंतु त्यानंतर पाण्याची कमतरता जाणवली. जैशानेही मला हेच सांगितले.’’

First Published on August 26, 2016 3:36 am

Web Title: few facts on op jaisha marathon race