जपानाच्या नोझोमी ओखुहाराचा पराभव करत अंतिम गाठलेली पी. व्ही. सिंधू शुक्रवारी स्पेनच्या कॅरोलिन मारिनशी सुवर्ण पदकासाठी झुंजणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही खेळाडुंनी प्रथमच ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली आहे. मारिन ही जागतिक क्रमवारीत प्रथम तर सिंधू दहाव्या स्थानी आहे. सिंधू आणि मारिन यांच्यात काटयाची लढत होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी दोघींमध्ये सात लढती झाल्या असून त्यातील चार सामने मारिनने जिंकले आहेत. सुवर्ण पदक पटकावण्यासाठी सिंधूसमोर असतील ही पाच आव्हाने
सिंधूपेक्षा मारिनाचा रेकॉर्ड सरस: आत्तापर्यंत सिंधू आणि मारिन यांच्या सात लढती झाल्या असून यात मारिनने चार वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे मारिनचे पारडे सिंधूवर भारी पडते. मारिनने सिंधूचा २०१४ मध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभव केला होता. मारिनने सिंधूबरोबरच सायना नेहवाललाही ऑल इंग्लंड बॅडमिंटन आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही पराभूत कले होते.
राफेल नदालप्रमाणे खेळ: कॅरोलिन मारिनला स्पेनची ”लेडी’ नदाल” म्हणून ओळखले जाते. राफेल नदालप्रमाणे मारिनही डाव्या हाताने खेळते. मारिनाने ताकदीने मारलेल्या फटक्याला परतावणे प्रतिस्पर्धी खेळाडूला कठीण जाते. त्याचबरोबर प्रत्येक फटक्याबरोबर तिच्या ओरडण्यामुळे समोरच्या खेळाडूची एकाग्रता भंग पावते.
सिंधूवर अंतिम फेरीचा दबाव: सिंधू आतापर्यंत अनेकवेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आहे. परंतु अनेकवेळा तिला अपयश आले. तर मारिना ही अंतिम फेरी जिंकण्यात पटाईत आहे. तिने मागील वर्षी जागतिक अजिंक्यपद व ऑल इंग्लंड ओपनचे जेतेपद पटकावले होते.
क्रमवारीत मागे: कॅरोलिन मारिन महिला बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या तर सिंधू ही दहाव्या स्थानी आहे. सिंधूच्या प्रदशर्नात सातत्य नाही. मारिनविरोधातील पहिले दोन सामने सिंधूने जिंकले होते. त्यानंतर मात्र तिला खेळात सातत्य राखता आले नाही.
रणनिती बदलण्यात तरबेज: कॅरोलिना मारिनची खेळण्याची शैली ही चिनी आणि जपानी खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. सामना सुरू असताना वेगाने आपली रणनिती बदलण्यात मारिन तरबेज आहे. चिनी खेळाडूंसारखे ती तांत्रिक पद्धतीने खेळत नाही. आशियाई खेळाडू जम बसल्यानंतर आक्रमक होतात. तर मारिनाच वैविध्यपूर्ण खेळावर भर देते.