23 February 2019

News Flash

‘रौप्य’ सिंधूचे हैदराबादेत जंगी स्वागत

रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली असून प्रत्येकाच्या हाती तिरंगा आहे.

(छायाचित्र सौजन्य - एएनआय ट्विटर हॅंडल)

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बँडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधू व तिचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांचे हैदराबादेत पारंपारिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. बेस्टच्या ‘निलांबरी’ बसमधून तिची मिरवणूक काढण्यात येत आहे.रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली असून प्रत्येकाच्या हाती तिरंगा आहे. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मोहम्मद महमूद अली हे स्वत: सिंधू व गोपीचंद यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते.
पारंपारिक वाद्याच्या गजरात हैदराबाद विमानतळावरून ही मिरवणूक निघाली असून हजारो लोक सिंधूचे स्वागत करण्यासाठी आले आहेत.निलांबरीतून चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत सिंधू गचीबाऊली स्टेडिअमवर होणाऱ्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जात आहे. निलांबरी बसला फुलांनी सजवले असून बसवर सिंधू, प्रशिक्षक गोपीचंद उभे आहेत. गचीबाऊली स्टेडिअमवरही विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित असून प्रत्येकाच्या हाती सिंधूच्या स्वागताचे फलक आहेत. स्टेडिअमवर पारंपारिक नृत्याचे सादरीकरण केले जात आहे.
बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली. तेलंगणा सरकार सिंधूचा गौरव करणार आहे. यावेळी प्रशिक्षक पी. गोपीचंद यांचाही सन्मान केला जाणार आहे. सिंधूला पाच कोटी रूपये बक्षिसाची रक्कम तेलंगणा सरकारने घोषित केली असून त्याचबरोबर तिला क्लास वन दर्जाची नोकरी व गोपीचंद अॅकडमी जवळ घर भेट देणार आहे. गोपीचंद यांनाही एक कोटी रूपये देण्यात येणार आहे.

ही मिरवणूक मुंबई बेस्टच्या ताफ्यातील निलांबरी बसमधून काढण्यात येत आहे. तब्बल १६०० किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईकरांची निलांबरी सिंधूच्या स्वागतासाठी हैदराबादेत गेली आहे. पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या कॅरोलिना मरिनशी मुकाबला केला. या सामन्यात सिंधूला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देणारी सिंधू ही चौथी महिला खेळाडू ठरली आहे. पदक जिंकल्यानंतर पी.व्ही. सिंधू हिच्यावर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

First Published on August 22, 2016 10:41 am

Web Title: grand welcome of p v sindhu in hyderabad