News Flash

‘रितू राणी प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले!’

रिओ ऑलिम्पिक संघातून रितू राणीची हकालपट्टी करण्याचा निर्णय घाईघाईत घेतला गेला.

रिओ ऑलिम्पिक संघातून रितू राणीची हकालपट्टी करण्याचा निर्णय घाईघाईत घेतला गेला. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले आणि त्यामुळे या प्रमुख खेळाडूचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. हॉकी इंडियाने हे प्रकरण समजुतीने हाताळायला हवे होते, असे मत भारताच्या माजी महिला हॉकीपटू एलिझा नेल्सन आणि सेल्मा डी’सिल्व्हा यांनी व्यक्त केले.

मॉस्को (१९८०) ऑलिम्पिकनंतर जवळपास ३६ वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक पात्रता मिळवली. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या माजी हॉकीपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र या सर्व आनंदमय वातावरणाला रितू राणी प्रकरणामुळे बट्टा बसला. त्यामुळे संघातील खेळाडूंसह माजी खेळाडूंमध्येही नाराजीचा सूर आहे.

मॉस्को ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय महिलांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर ऑलिम्पिकचे दार उघडण्यासाठी २०१६ हे वर्ष उजाडले. भारतीय महिला संघाच्या घवघवीत यशावर आनंद व्यक्त करताना नेल्सन आणि डी’सिल्व्हा यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. माजी कर्णधार नेल्सन म्हणाल्या, ‘‘महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला ही बातमी समजल्यावर आम्ही आनंदाने नाचू लागलो. पात्रता पद्धतीत बदल झाल्यामुळे आणि अनेक देशांमध्ये खेळण्याच्या अनुभव गाठीशी असल्यामुळे महिलांना ही भरारी घेता आली. सुशीला चानू संघाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळण्यात सक्षम आहे. रितू राणीशिवायही संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रितूच्या हकालपट्टीचा संघाच्या मानसिकतेवर काही परिणाम होणार नाही. प्रत्येक खेळाडू हा महत्त्वाचा असतो. पण हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले.’’

१९८३च्या विश्वचषक स्पध्रेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या डी’सिल्व्हा यांनीही रितू राणीच्या हकालपट्टीवर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘रिओ ऑलिम्पिक पात्रता मिळवून देण्यात रितू राणीचा महत्त्वाचा वाटा होता आणि एका चुकीमुळे तिची ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी हिरावून घेणे चुकीचे आहे. तिला समज देऊनही चालले असते. तिच्याकडून चूक झाली, हे नाकारत नाही. मात्र, त्यासाठी दिलेली ही शिक्षा अधिक आहे.’’

नव्या रचनेचा संघाला फायदा

ऑलिम्पिक स्पध्रेतील रचनेत बदल केल्याचा फायदा भारतीय महिला संघाला मिळू शकतो. प्रत्येक गटातून चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील आणि भारताला ही मजल मारणे अशक्य नाही. त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करणे चुकीचे आहे, परंतु उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची झेपही ऐतिहासिक असेल, असे मत डी’सिल्व्हा यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी महिला हॉकी संघाचे थेट प्रक्षेपण करून महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीचे आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 3:38 am

Web Title: hockey india feels differently about women players says ritu rani
Next Stories
1 VIDEO: ..या पॅरालिम्पियनचा लक्ष्यवेध पाहून आश्चर्यचकीत व्हाल
2 भविष्यात ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश होईल- कपिल देव
3 रिओ ऑलिम्पिक: नरसिंग यादवला ‘वाडा’कडून हिरवा कंदील
Just Now!
X