scorecardresearch

मी सरकारविरूद्ध लढू शकत नाही, पण मला सत्य माहिती आहे- ओपी जैशा

निष्काळजीपणामुळे शर्यत संपल्यानंतर ओपी जैशा चक्कर येऊन खाली पडली होती.

OP Jaisha , I can not fight against the government , rio 2016, Olympic , marathon runner O P Jaisha, , sports news, loksatta, Loksatta news, Marahti, Marathi news
OP Jaisha

रिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन शर्यतीच्यावेळी चक्कर येऊन पडल्यामुळे चर्चेत आलेली भारतीय धावपटू ओपी जैशा हिने मंगळवारी भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनच्या (एएफआय) कारभारावर ताशेरे ओढले. रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते. पण भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हते, असा धक्कादायक खुलासा करून ओपी जैशाने एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर भारतीय खेळाडू आम्ही उपलब्ध करून दिलेली सेवा घेत नव्हते, असा दावा एएफआयने केला होता. त्याला ओपी जैशाने आज प्रत्युत्तर दिले. एएफआयचे प्रतिनिधी त्याठिकाणी हजर नव्हतेच तर त्यांना सत्य कसे कळणार?, त्याठिकाणी सर्वत्र कॅमेरे होते, त्यामुळे कॅमेऱ्यांमध्ये बघून सत्य काय ते जाणून घ्यावे, असे जैशाने म्हटले आहे. एएफआयने जैशाचे सर्व आरोप फेटाळून लावत आम्ही सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता. जैशा किंवा तिच्या प्रशिक्षकांनी आम्हाला त्यांना हव्या असलेल्या ड्रिंकबद्दल कोणतीही माहिती दिली नसल्याचेही एएफआयने म्हटले होते. त्यानंतर जैशाने आपण निष्पाप असल्याचे सांगत मी सरकार किंवा एएफआयविरुद्ध लढू शकत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. मात्र, विधात्याला आणि मला सत्य काय आहे ते माहिती आहे, खेळाचे माझ्यावर खूप उपकार आहेत, असे ओपी जैशाने सांगितले.
‘झिका’च्या पाश्र्वभूमीवर कविता राऊतची वैद्यकीय तपासणी
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय मॅरेथॉनपटूंनी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर ऑलिम्पिकपटूंनी भारतीय व्यवस्थापनाबाबत एक धक्कादायक खुलासा केला होता. रिओ ऑलिम्पिकमधील मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय पथकासोबत आलेल्या अधिकाऱयांनी आपल्याला पाणी देखील विचारले नव्हते, असा आरोप धावपटू ओपी जैशा हिने केला होता. भारतीय अधिकाऱयांच्या याच निष्काळजीपणामुळे शर्यत संपल्यानंतर तहानेने व्याकूळ झालेली ओपी जैशा चक्कर येऊन खाली पडली होती.
मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गात दर अडीच किलोमीटर अंतरावर प्रत्येक देशाला विसावा केंद्रासाठी (रिफ्रेशमेंट पॉईंट) जागा देण्यात आली होती. या केंद्रांवर इतर देशांचे अधिकारी पाणी, ग्लुकोज आणि इतर वस्तू घेऊन उभे होते. मात्र, भारतीय केंद्रांवर केवळ आपल्या देशाचे नाव आणि तिरंगा या व्यतिरिक्त काहीच नव्हते. इतकेच नाही, तर एकही भारतीय अधिकारी केंद्रांवर उपस्थित नव्हता, अशी धक्कादायक माहिती ओपी जैशा हिने ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राशी बोलताना दिली होती.

मराठीतील सर्व रिओ २०१६ ऑलिम्पिक ( Rio-2016-olympics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I can not fight against the government or afi but i know the truth op jaisha

ताज्या बातम्या