रिओ ऑलिम्पिकमध्ये कलात्मक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेली भारतीय महिला जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकर हिचे सर्वत्र भरभरुन कौतुक केले जात आहे. लवकरच दीपा मायदेशात दाखल होणार असून, तिचे कुटुंबिय आणि चाहते तिची आतुरतेने वाट पाहात आहेत. दीपासुद्धा भारतात परतण्यासाठी उत्सुक आहे. नुकतेच दीपाने आपल्या भावना ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केल्या. ती म्हणाली की, गेल्या अनेक महिन्यांपासून मी ऑलिम्पिकच्या तयारीसाठी माझ्या आहारात आणि एकूणच दैनंदिन जिवनात बदल केले होते. रिओमध्ये दररोज मला नाश्त्यासाठी चिकन दिले जायचे, कारण पुढील निदान दहा तास तरी मला सरावासाठी उपाशी रहावे लागत असे. माझ्या प्रशिक्षकांचे माझ्या आहारावर पूर्णपणे लक्ष होतेच, पण ठराविक पदार्थच मला आहारात हवेत, असा माझा कधीही आग्रह नसायचा. त्यामुळे स्पर्धेसाठी देशाबाहेर गेले तरी तेथील आहाराशी जुळवून घेणे मला सोपे जाते. पण, शेवटी मायदेशापेक्षा इतर कोणताही देश आपल्याला प्रिय वाटू शकत नाही. भारतासारखा देश या जगात नाही. त्यामुळे देशातील नागरिक माझ्या कामगिरीवर आनंदी असतील, तर मी देखील आनंदी आहे. तरीही जोवर सुवर्ण पदक पटकावत नाही तोवर मी शांत बसणार नाही, असेही ती पुढे म्हणाली.

वाचा: दीपा कर्माकरची खेलरत्नसाठी शिफारस

ऑलिम्पिकसाठी गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून दीपाने बर्गर, आयस्क्रिम असे पदार्थ खाल्ले नाहीत. पण, तिच्या प्रशिक्षकांनी अंतिम फेरी झाल्यानंतर दुसऱया दिवशी रिओच्या क्रीडानगरीत ‘मॅकडोनल्ड्स शॉप’मध्ये रांगेत उभे राहून दीपासाठी ‘बिगमॅक बर्गर’ खरेदी केले.
दीपानेही आपल्याला घरी परतल्यानंतर रसगुल्ले खाण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, मला घरी जाऊन त्वरित रसगुल्ल्यांवर ताव मारणार आहे. मी गेल्या अनेक महिन्यांपासून आहारात रसगुल्ल्यांचा त्याग केला होता, पण आता मी खूप थकले आहे. मात्र, मला हेही माहित आहे की, माझ्या आजवरच्या प्रवासात मला अनेकांची मदत झाली आहे आणि ते सर्वजण मला मायदेशी परतल्यांनतर आवर्जुन भेटणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर माझ्या वागणुकीत बदल झाला, असे त्यांचे मत होऊ नये म्हणून शक्य होईल तितक्या जणांची मी भेट घेणार आहे, असेही ती पुढे म्हणाली.

वाचा: दीपा कर्माकर आणि ललिता बाबरच्या नावाने विमान आणि ट्रेन सुरू करा- सेहवाग