दीपा कर्माकरचा निर्धार; पदक हुकल्याने निराश नाही

‘‘रिओ ऑलिम्पिकमध्ये मी पदकाची अपेक्षा केली नव्हती. जगातल्या अव्वल जिम्नॅस्ट्सना टक्कर देत चौथे स्थान पटकावणे, ही दिमाखदार कामगिरी आहे. बॉक्सिंग किंवा कुस्तीत चौथे स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला कांस्यपदक मिळते. मात्र जिम्नॅस्टिक्समध्ये तशी पद्धत नाही. मी पदकाच्या अगदी जवळ आले होते. चार वर्षांनंतर माझे ध्येय सुवर्णपदकाचेच असेल,’’ अशा शब्दांत भारताची लाडकी लेक जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्स प्रकारासाठी पात्र ठरणारी दीपा पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. पात्रता फेरीत ‘प्रोडय़ुनोव्हा’ या अत्यंत अवघड सादरीकरणासह दीपाने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही दीपाने ‘प्रोडय़ुनोव्हा’

सादर केला. मात्र तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘‘सर्व भारतीयांचे मनापासून आभार. देशवासीयांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांच्या बळावरच हे यश मिळवू शकले,’’ असे कृतज्ञ दीपाने सांगितले.

‘‘ही माझी पहिली ऑलिम्पिकवारी आहे. माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. अंतिम फेरीत मिळवलेले गुण कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र पदक पटकावणाऱ्या तिघींची कामगिरी माझ्यापेक्षा चांगली होती. तो दिवस माझा नव्हता. पण निराश होण्याचे काहीच कारण नाही. टोकियोत २०२०मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करेन,’’ असा विश्वास दीपाने व्यक्त केला.

ती म्हणाली, ‘‘अवघ्या काही गुणांनी माझे कांस्यपदक हुकले. नशिबाची थोडी साथ मिळाली असती तर पदक मिळाले असते. पण तक्रार करण्याचे काहीच कारण नाही. पहिल्या ऑलिम्पिकवारीत चौथे स्थान मिळवण्याचा मी कधीच विचार केला नव्हता. दोन व्होल्टमध्ये गुणांकन सुधारणे, हे माझे उद्दिष्ट होते. मी जे काही शिकले ते सादर करू शकले. माझी सर्वोत्तम कामगिरी केली.’’

‘प्रोडय़ुनोव्हा’ या अवघड सादरीकरणाबद्दल विचारले असता दीपा म्हणाली, ‘‘प्रोडुनोव्हा प्रकारातील हे माझे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याआधी मला १५.१ गुण मिळाले होते. व्होल्टमधील माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. देशासाठी पदक मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र नशिबाचाही भाग होता. जिम्नॅस्टिक हा खेळ सोपा नाही. आम्हाला विदेशी प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले नाही. बिश्वेश्वर नंदी सरांचे मार्गदर्शन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साइ) प्रयत्न यांच्या बळावर मी हे यश मिळवले. विदेशात प्रशिक्षणाचीही संधी मिळाली नाही. ऑलिम्पिकसाठी सरावाला आम्हाला तीन महिन्यांचा वेळ मिळाला. माजी ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या बरोबरीने खेळताना चौथे स्थान ही उत्तम कामगिरी आहे. सुवर्णपदक विजेत्या सिमोन बिलेसच्या तुलनेतही माझी कामगिरी चांगली आहे. ती सातत्याने सुवर्णपदके पटकावत आहे.’’

पदकाच्या समीप येऊनही चौथे स्थान मिळाल्याने नाराज आहेस का, यावर दीपा म्हणाली, ‘‘माझे पालक आणि प्रशिक्षक नंदी सर चौथ्या स्थानामुळे निराश आहेत. मी पाचवे किंवा सहावे स्थान मिळवले असते तर गोष्ट वेगळी होती. मात्र पदकाच्या इतके समीप येऊनही चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने घरचे आणि प्रशिक्षक नाराज होणे साहजिकच आहे.’’

अंतिम फेरीत दिमाखदार कामगिरीसह दीपा मिल्खा सिंग, पी.टी. उषा यांच्या पंक्तीत दाखल झाली आहे. याविषयी विचारले असता दीपा म्हणाली, ‘‘मिल्खा सिंग, पी.टी. उषा यांच्या तुलनेत मी खूपच लहान आहे. माझे वयही कमी आहे. ज्या दिवशी भारतासाठी सुवर्णपदक पटकावेन, त्या दिवशी या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊ शकेन. हे सगळे महान खेळाडू आहेत. मी त्यांच्या जवळपासही नाही. पदकासाठी सर्वोत्तम प्रदर्शनाचा माझा प्रयत्न आहे.’’

दीपाच्या कामगिरीचा अभिमान -दुलाल कर्माकर.

‘‘दीपाचे ऐतिहासिक ऑलिम्पिक पदक हुकले आहे. मात्र तिच्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे. पदक हुकले, याचे मला दु:ख नाही. तिने जगातल्या अव्वल जिम्नॅस्टिकपटूंच्या बरोबरीने सर्वोत्तम कामगिरी केली. ही तिची पहिलीच ऑलिम्पिकवारी आहे. टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धेत ती आणखी दिमाखदार कामगिरी करून देशासाठी पदक जिंकेल. तिने आपल्या शानदार कामगिरीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पुढच्या ऑलिम्पिकसाठी अजून चार वर्षे बाकी आहेत. ती अथक सराव करील आणि देशासाठी पदक आणेल. ती आता त्रिपुराची लहानगी दीपा राहिलेली नाही तर देशाची लाडकी लेक झाली आहे,’’’ असे दीपाचे वडील दुलाल कर्माकर यांनी सांगितले.

लँडिंगमधील उणिवांमुळे पदक हुकले -विश्वेश्वर नंदी

‘प्रोडय़ुनोव्हा’ पूर्ण करताना दीपा थोडी खोलवर गेली. उभे राहून तिने सादरीकरणाचा शेवट केला असता तर सुवर्णपदक तिचेच होते. मात्र सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात ती क्षणभरासाठी खाली बसली आणि तिचे गुण कमी झाले. पहिल्या व्होल्टमध्ये मात्र तिची कामगिरी सुरेख होती. मात्र जगातल्या मातब्बर जिम्नॅस्टच्या बरोबरीने खेळताना पदकाच्या शर्यतीत असणे हीच मोठी गोष्ट आहे. दीपाने सर्वतोपरी प्रयत्न केले. चौथे स्थान म्हणजे पदकाच्या अगदी समीप क्षण होता. पदक हुकल्याने निराश होण्याचे कारण नाही. कारण दीपाने सर्वोत्तम प्रदर्शन केले.