ऑलिम्पिक पदकासह अलविदा करण्याचे कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकले नाही. रिओ ऑलिम्पिक अभियानाच्या शेवटच्या दिवशी योगेश्वरला पात्रता फेरीच्या लढतीतूनच गाशा गुंडाळावा लागला. मॅरेथॉन शर्यतीत थोनकळ गोपीला २५व्या आणि खेतारामला २६व्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर नीतेंद्र नागरने ८४व्या स्थानासह शर्यत पूर्ण केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदकांसह भारतीय चमूने दमदार कामगिरी केली होती. त्यातून प्रेरणा घेत भारतीय क्रीडापटू रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकसंख्या वाढवतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात भारताला अवघ्या दोन पदकांवरच समाधान मानावे लागले.

कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताचे पदकांचे खाते उघडले. कुस्तीत पदक मिळवणारी साक्षी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. त्यानंतर पी.व्ही. सिंधूने सातत्यपूर्ण दिमाखदार कामगिरीच्या बळावर रौप्यपदकाची कमाई करत इतिहास घडवला. रौप्यपदक पटकावणारी ती पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. २१व्या वर्षी ऑलिम्पिक पटकावणारी ती सगळ्यात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरली आहे.

या पदकप्राप्त खेळाडूंव्यतिरिक्त जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर आणि धावपटू ललिता बाबरने अफलातून कामगिरी करत देशवासियांची मने जिंकली. जिम्नॅटिक्स प्रकारात प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या दीपाने प्राथमिक फेरीत ‘प्रोडय़ुनोव्हा’च्या अवघड सादरीकरणासह दिमाखात अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही सुरेख कामगिरीसह दीपाने पदकासाठी दावेदारी सिद्ध केली. मात्र तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ०.१५ एवढय़ा छोटय़ा फरकाने दीपाचे पदक हुकले. मात्र जिम्नॅस्टिक्ससारख्या लवचिकतेची कसोटी पाहणाऱ्या खेळात दीपाने घेतलेली भरारी देशभरातल्या या खेळाच्या प्रसाराला चालना देणारी ठरेल.

सातारा जिल्ह्यातील माण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धावपटू ललिता बाबरने जगभरातल्या अव्वल धावपटूंना टक्कर देत ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात आपले कर्तृत्व सिद्ध केले. पात्रता फेरीत शानदार वेळ नोंदवत ललिताने अंतिम फेरी गाठली. ३२ वर्षांनंतर मैदानी क्रीडा प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ललिता पहिली भारतीय ठरली. अंतिम फेरीत ललिताला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

उत्तेजकांच्या सेवनप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने निर्दोष सुटका केलेल्या नरसिंग यादव प्रकरणी जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागितली. आहारात भेसळ करून उत्तेजके देण्यात आल्याचा मुद्दा नरसिंग पटवून देऊ शकला नाही. त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे रिओत दाखल झालेल्या नरसिंगला न खेळताच मायदेशी परतावे लागले आणि त्याच्या कुस्तीतील भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नामुष्की सहन करावी लागली.