ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारत इतिहास घडवणारी दीपा कर्माकर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता जितू राय यांची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार अर्थात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयातर्फे नियुक्त निवड समितीने या दोघांची शिफारस करण्याचा निर्णय घेतला.

त्रिपुराच्या दीपाने जागतिक स्तरावरील अव्वल जिम्नॅस्टपटूंना टक्कर देत ‘प्रोडय़ुनोव्हा’ हा कठीण प्रकार सादर केला. तिचे पदक अवघ्या काही गुणांनी हुकले. दीपाच्या या ऐतिहासिक कामगिरीची नोंद १२ सदस्यीय निवड समितीने घेतली आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारशी पाठवण्याची निर्धारित तारीख उलटून गेली आहे. मात्र विशेष बाब म्हणून निवड समितीने दीपाच्या नावाची शिफारस केली आहे. २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत दीपाने कांस्यपदकाची कमाई केली होती.

नेमबाज जितू राय ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नेमबाज ठरला होता. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात त्याने अंतिम फेरीही गाठली. मात्र पदकाने त्याला हुलकावणी दिली. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत जितू तिसऱ्या स्थानी होता. जितूने २०१४मध्ये स्पेन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत उर्वरित दिवसांमध्ये पदक पटकावणाऱ्या भारतीय क्रीडापटूची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.